बिबट्या, तरस, रानडुकरांचे हल्ले : पशुधनाच्या मदतीत वाढ

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – बिबट्या, रानडुक्कर, लांडगा, तरस, रानकुत्रे यांच्या हल्ल्यांत मनुष्यहानी व पशुधन हानी प्रकरणी देण्यात येणार्‍या मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल व वन विभागाने जारी केले आहे. यापूर्वी ही मदत देण्यात येत होती. पण ती कमी असल्याने ती वाढविण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागल्याने याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे.

वन्यप्राणी हल्ल्यांमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रकमेपैकी तीन लाख देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम 7 लाख रूपये त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणार्‍या संयुक्त खात्यात ठेव रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास शक्यतो शासकीय अथवा जिल्हा परिषेदेच्या रूग्णालयात करावा. खासगी रूग्णालयात केल्यास 20हजार रूपये प्रती व्यक्तीस दिले जाणार आहेत. वन्यप्राणी हल्ल्यांमुळे व्यक्ती मृत्यू /अपंगत्व किंवा गंभीररित्या जखमी प्रकरणी पुढीलप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे.

नगर जिल्ह्याला होणार लाभ
नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर व अन्य तालुक्यात बिबट्याचे हल्ले होण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अनेक ठिकाणी शेतकरी, तरूण, लहान मुलांवर हल्ले झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी शेळ्या, मेंढ्या तसेच गायी मृत झाल्या आहेत. आता मदतीत वाढ झाल्याने याचा फायदा या होणार आहे.

 

व्यक्ती मृत झाल्यास 10 लाख व्यक्ती कायम अपंग झाल्यास 5 लाख, गंभीररित्या जखमी झाल्यास सव्वा लाख, किरकोळ जखमी, झाल्यास 20 हजार

पशुधन मृत्यू /अपंगत्व किंवा गंभीररित्या जखमी प्रकरणी पुढीलप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे.
गाय, म्हैस व बैल मृत झाल्यास बाजारभाव किमतीच्या 75 टक्के किंवा 40 हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम.
मेंढी, बकरी व इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या 75 टक्के किंवा 10 हजार रूपये यापैकी कमी असणारी रक्कम.
गाय, म्हैस व बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किमतीच्या 50 टक्के किंवा 12 हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम.
गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास औषधोपचार शासकीय अथवा जिल्हा परिषद पशुचिकित्सालयात करण्यात यावा. देय रक्कम मर्यादा बाजारभावाच्या 25 टक्के किंवा चार हजार रुपये प्रतीजनावर यापैकी कमी असणारी रक्कम देण्यात येणार आहे.
ही नुकसान भरपाई पशुवैद्यकीय अधिकार्‍याने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*