Type to search

आवर्जून वाचाच नवरात्री सार्वमत

हायजीन फर्स्ट वैशालीताई

Share

नगर टाईम्स 

नवरात्री स्पेशल – नव ‘दुर्गा’ 

नीटनेटकं रहाणं अन् चागलंचुंगलं खाणं ही प्रत्येकाचीच हॅबीट असल्याचा हा जमाना. धावपळीच्या जीवनात आपण काय खातोय, कसं खातोय याच्या चौकशी करण्याची फुरसत कुणालाच नाही. नगरच्या वैशाली रोहीत गांधी मात्र त्याला अपवाद. खाद्यपदार्थांच्या स्वच्छता प्रबोधनाचा त्यांचा वसा पुढं चळवळीत परावर्तीत झाला. हातगाड्या, हॉटेल्स, अंगणवाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत त्यात बदल करण्यात त्या यशस्वी झाल्या. आज हायजीन अन् वैशालीताईंचा नातं अतुट झालंय…

वैशाली यांचं मुळं गाव पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर. वैशालीताईंचा जन्म झाला, त्यावेळी त्यांचे वडील अशोकशेट कटारिया हे देवीभोयरे येथील साखर कारखान्याचे संचालक होते. राजकारणासोबतच ते समाजकार्यातही सक्रिय असल्याने वैशालीताईंना कुटुंबाताच समाजकार्याचं बाळकडू मिळालं. डॉ. विजय भंडारी यांच्या मदतीने त्या नगरात कॉलेज शिक्षणासाठी आल्या. भंडारी यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण पूर्ण केले अन् त्यांच्याच मध्यस्थीने त्या पारनेरमधील गांधी कुटुंबियांच्या सूनबाई झाल्या. डॉ. रमेश गांधी हे पारनेरचे सुप्रसिध्द डॉक्टर. त्यांचा मुलगा डॉ. रोहित यांच्याशी त्या विवाहबंधनात अडकल्या.

माहेरी मिळालेला समाजसेवेचा वसा वैशालीताईंनी सासरी जपला. सासरे अन् पती दोघांनीही त्यासाठी पाठबळ दिले.
वैशालीताई खासगी कामानिमित्त एकदा मुंबईला गेल्या. त्या ज्या हॉटेलात गेल्या तेथे किचन अन् टॉयलेट एकत्र होते. ते पाहून त्यांना किळसवाणे झाले. मग त्यांनी सत्य जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी ‘हायजीन’चळवळ सुरू केली. त्यासाठी औरंगाबादला लॅन्ड मार्क हा कोर्स केला. तेथे आपण समाजाचे काही देणं लागतो ही बाब त्यांना प्रकर्षाने जाणवली. पुढं त्यांनी नगरच्या कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करून फिल्डसंदर्भात नॉलेज अपडेट केलं अन् सुरू झाली हायजीन फर्स्ट ही चळवळ. पण हे काम सोप्पं नव्हतं. त्यामुळं त्यांनी पती डॉ. रोहित यांच्याशी चर्चा केली. पूर्ण पाठबळ देत असाल तरच पुढे जाऊया असं स्पष्ट सांगितलं. पती डॉक्टर असल्याने त्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला अन् सुरू झालं पुढचं कार्य.

वैशालीताईंना ईश्वर बोरा, वैशाली मुनोत, वैशाली झंवर, दीपाली चुत्तर, किर्ती शिंगवी, अश्लेषा भांडारकर, रुपाली बिहाणी, पियुष शिंगवी, निर्मल गांधी, मनिषा बोरा, सागर शर्मा, रजत दायमा, गायत्री रेणावीकर, अशोक सचदेव, डॉ. रोहित गांधी, गिरीष कुकरेजा, मयुर राहिंज, मेहेरप्रकाश तिवारी, अनुराधा रेखी, सुरूभी सावज आणि वंदना विटनकर यांची साथ लाभल्याने पाहता पाहता चळवळ वेगाने पुढं वाटचाल करतेय. वैशालीताईंनी आतापर्यंत 40 हॉटेल्स, 60 हातगाड्या अन् 53 अंगणवाड्यांमध्ये हायजीन फर्स्ट ही चळवळ यशस्वीपणे राबविली. तेथे स्वच्छता नांदते आहे. त्याचं सगळं श्रेय हे वैशालीताईंचे पण त्यांनी कधीच त्याचा गाजावाजा केला नाही. त्यामुळंच नगरकरांसाठी त्या खर्‍या अर्थान नवदुर्गाच आहे.
…………….
नगर फर्स्ट इन इंडिया
नगरला भारतातील पहिली हायजीन सिटी करण्याचा मानस ठेवत वैशालीताईंनी ही चळवळ सुरू केली. त्यासाठी त्यांनी एनजीओ काढली. या संस्थेतील सदस्यांनी त्यांना तन-मन-धनाने सहकार्य केल्याने ही चळवळ व्यापक स्वरुपात पुढं वाटचाल करताहेत.
………….
नारी ही अपराजिता..
नारी है अपराजिता.. नारी का सन्मान करो’ असं म्हटलं जातं. वैशालीताईंनी नगरमध्ये इतर महिलांनाही जागृत करण्याचा काम करत स्वत: चं वेगळं अस्तित्व सिध्द केलंय. एकत्रित फॅमिली, पतींचा डॉक्टरी पेशा अन् दोन मुलं हे सगळं सांभाळून वैशालीताई ‘हायजीन फर्स्ट’ चळवळीसाठी आहोरात्र झटत आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!