महापालिका – पोलीस बंदोबस्तात वसुली; मालमत्तांचा लिलाव करणार

थकित कर जमा करण्यासाठी महापालिकेने जोर वाढविला

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेने आता वसुलीसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. तसेच यापूर्वी सील केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचीही तयारी सुरू केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दि. 6 रोजी 25 लाखांची वसुली करण्यात आली. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे दहा लाख रुपये आहेत.

जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी पदभार स्वीकारताच वसुली आणि स्वच्छता अभियानाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मालमत्ता कराची जवळपास 285 कोटींची थकबाकी असून, त्यातील अनेक प्रकरणे न्यायालयीन प्रवीष्ठ आहेत. मात्र जे न्यायालयात प्रकरणे नाहीत, मात्र जाणीवपूर्वक संबंधित मालमत्ताधारकाकडून कर जमा केला जात नाही, अशांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्विवेदी यांनी दिले आहेत. यासाठी मालमत्ता जप्त करण्यापासून, संबंधित मालमत्तेचे नळजोड तोडण्याचेही आदेश दिले आहेत.

शिवाय थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर झळकविण्याचीही तयारी सुरू आहे. द्विवेदी आज महापालिकेत जवळपास चार तास ठाण मांडून होते. या काळात त्यांनी विभागप्रमुखांना स्वतंत्रपणे बोलावून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत थ्री स्टार मानांकन मिळविण्यासाठी ते रोज पाठपुरावा करत आहेत. आजही त्यांनी याबाबत माहिती घेतली. तसेच सायंकाळी उशीरा जिल्हाधिकारी कार्यालयातही महापालिकेच्या अधिकार्‍यांना बोलावून रोजच्या कामाचा आढावा घेतल्याचे समजते.

मालमत्ता कर वसुलीचे प्रत्येक प्रभाग समित्यांना उद्दिष्ट दिलेले असल्याने सर्वच कर्मचारी आता कामाला लागले आहेत. आज याचाच परिणाम म्हणून 25 लाखांची वसुली झाली. बाजार समितीकडे थकित असलेले दहा लाख रुपये कारवाईचा बडगा उगारताच जमा झाले. यापुढे वसुली मोहीम तीव्र होणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणीही पोलीस यंत्रणेकडे करण्यात आली आहे. यामध्ये एक अधिकारी आणि आठ पुरूष व आठ महिला कर्मचार्‍यांची मागणी केली आहे.

प्रत्येक प्रभाग समितीमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात वसुली मोहीम आणि कारवाई करण्यात येणार आहे. अनेकदा जप्तीची कारवाई करताना महापालिका कर्मचार्‍यांना विरोध केला जातो. काही वेळा शिविगाळ व मारहाणीचेही प्रकार घडतात. तसेच यावेळी केवळ जप्तीवरच न थांबता नळजोड तोडण्याचीही कारवाई होणार असल्याने पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितल्याने त्यासाठी द्विवेदी यांनी तयारी दर्शवून पोलीस यंत्रणेकडे तसे पत्र दिले आहे. तसेच यापूर्वी थकबाकी जमा न करणार्‍या मात्र त्यामुळे सील केलेल्या मालमत्तांची थकित रक्कम अदा झालेली नाही. जप्तीची कारवाई करूनही मालमत्ताधारक थकबाकी जमा करत नसल्याने या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय झाला आहे. महापालिकेने तशी यादी तयार केली असून, त्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.

प्लॅस्टिकविरोधी कारवाईवरून वादावादी
महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी कारवाई जोरदार सुरू केली आहे. गुरूवारी 92 हजार रुपयांचा दंड जमा केल्यानंतर शुक्रवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती. सायंकाळपर्यंत 26 हजारांचा दंड जमा केला होता. मात्र व्यावसायिक आणि कारवाई करणारे कर्मचारी यांच्यात अनेक ठिकाणी खटके उडत होते. कोणत्या प्लॅस्टिकला परवानगी आहे, कोणत्या नाही, हे वादाचे कारण होते. त्या संदर्भातील तक्रारीही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे येत होत्या. मात्र कारवाई सुरूच ठेवण्यात आल्याने प्लॅस्टिकचा वापर करणार्‍या व्यावसायिकांना दंड भरण्याशिवाय पर्याय राहिला नाही.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *