मोहरम मिरवणुकीला सावेडीत गालबोट

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – मोहरम विसर्जन मिरवणूक दिल्लीगेटबाहेर शांततेत काढण्यात पोलिसांना यश आले, मात्र सावेडीत मिरवणुकीला गालबोट लागले. सावेडीत रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास झालेल्या दगडफेकीने तणाव निर्माण झाला. परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तातडीने पोलिसांची कुमक सावेडीत पोहचल्याने जमाव पांगला.

रविवारी दुपार एक वाजेच्या सुमारास मोहरम विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने मिरवणूक शांततेत सुरू होती. कोठला येथून छोटे इमाम यांची सवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास विसर्जनासाठी निघाली. काही तासानंतर ही सवारी मंगलगेट येथील बडे इमाम यांच्या भेटीसाठी गेली. त्यानंतर एकत्रितपणे दोन्ही सवार्‍यांची मिरवणूक सुरू झाली. मंगलगेट, दाळमंडई चौक, पिंजार गल्ली, जुना बाजार, देंवद्र हॉटेल, बारातोटी करांजा, बाबू गल्ली, जुना मंगळवार बाजार, पंचवीर चावडी, जुनी महानगरपालिका, सबजेल चौक, झारेकर गल्ली, आनंदी बाजार चौक सांगळे गल्ली, चौंपाटी करांजा, दिल्लीगेट, बालिकाश्रम रोड मार्गे सावेडी गाव येथे सवार्‍यांचे विसर्जन करण्यात आले.
मिरवणूक सावेडीत पोहचल्यानंतर दगडफेक झाली. त्यामुळे झालेल्या पळापळीत महिला जमिनीवर पडल्याने जखमी झाल्या आहेत. दरम्यान दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सवारी कोंड्यामामा चौकात आली. त्यावेळी तेथेही किरकोळ वादावादी झाली, मात्र पोलिसांनी परिस्थती तत्काळ नियंत्रणात आणली. सायंकाळी बुरूडगल्ली येथून अनेक यंग पार्ट्या मिरणुकीत सहभागी झाल्या. अनेक यंग पार्ट्यांच्या वतीने भाविकांना सरबतचे वाटप करण्यात येत होते. यावेळी चौकाचौकात सवारींवर चादर अर्पण करून स्वागत करण्यात आले. साडेनऊच्या सुमारास सवारी दिल्लीगेट बाहेर पडली.

LEAVE A REPLY

*