गांधींच्या प्रतिमेला भारनियमनाचा धक्का!

0

सरकारला घरच्या आहेराची आयडीया आली अंगलट

अहमदनगर : शिवसेना सत्तेत असूनही जनतेच्या प्रश्‍नांवर रस्त्यावर उतरते अन भाजपाला चिमटीत पकडते. नगर भाजपानेही भारनियमनाविरोधात आंदोलन केलं. सरकारविरोधातील या आंदोलनाचे रिपोर्टिंग विरोधी गटाने थेट प्रदेश आणि केंद्रीय स्तरावर केले. खासदार दिलीप गांधी यांना आंदोलन करायला लावायची आयडियाची कल्पना नेमकी कोणाची? याची चर्चा शहर भाजपात सुरू झालीय. या आंदोलनाने गांधींच्या प्रतिमेला धक्का लागल्याचे चित्र आहे.

नगरसेवक किशोर डागवाले यांचीच आंदोलनाची शक्कल असल्याचे समोर आले आहे. त्यांनीच आंदोलनाची घोषणा केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. डागवाले यांची भूमिका जनहिताची असली तरी पक्ष हितासाठी मारक असल्याचा बोभाटा त्यांच्या विरोधकांनी सुरू केला आहे.
शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या बोटाला धरून राजकारणात आलेले किशोर डागवाले व्हाया मनसे थेट भाजपाच्या तंबूत दाखल झालेत. त्यांच्या करनी अन् कथनीमध्ये अंतर आहे, असा त्यांच्यावर आरोप होतो. त्यांच्या ‘खोडसाळ’पणाच्या फटक्याने खासदार दिलीप गांधी यांची ‘इमेज’ पक्षात डागळण्यास सुरूवात झाली आहे. गांधी यांनी त्यांच्या राजकीय हयातीत तेही सत्तेत असताना भाजपाविरोधात केलेले आंदोलन त्याला कारणीभूत ठरू पाहत आहे.
महापालिकेच्या सभागृहात ज्येष्ठ सदस्य म्हणून किशोर डागवाल हे नाव अग्रभागी. अभ्यासूपणामुळे आयुक्तांनाही घाम फोडणारे डागवाले आता खासदार दिलीप गांधी यांच्या मदतीने भाजपवासी झाले आहेत. त्यांच्या प्रवेशाच्या बारशालाही भाजपांतर्गत दुही उफळून आली. एका अर्थाने ती खरीच होती, याचा प्रत्यय येण्यास सुरूवात झाली आहे. त्याची पहिली झलक गुरूवारी दिसली.
नगर शहर, जिल्ह्यासह राज्यात भारनियमन सुरू आहे. राज्यात भाजपचे सरकार असून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जा खाते सांभाळत आहे. त्यांच्या कारभाराविरोधात चितळे रस्त्यावर गुरूवारी रात्री भारनियमनाविरोधात डागवाले यांच्या प्रभागातील नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले. व्होट बँक समोर दिसत असल्याने डागवाले यांना त्यांचे भरते आले. काही मिनिटांत ते तेथे पोहोचले. मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्यांनी शुक्रवारी भारनियमनाविरोधात भाजप आंदोलन करणार असल्याचे जाहीर करून टाकले. त्यांच्या घोषणेला दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण ते पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहे. अर्थात हे पदही पक्षाने त्यांना बहाल केले ते खासदार दिलीप गांधी यांच्याच कृपादृष्टीने. डागवाले नगरात आंदोलनाची घोषणा करत असताना खासदार दिलीप गांधी हे दिल्लीच्या दिशेने प्रवासासाठी विमानात बसलेले होते. नंतर त्यांच्याशी चर्चा झाली किंवा नाही हे दोघांनाच ठाऊक.
डागवाले यांनी पुढाकार घेतल्यावर खासदारपुत्र सुवेंद्र गांधी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, मध्यनगर मंडलाचे प्रमुख नरेंद्र कुलकर्णी यांच्यासह भाजप (नव्हे गांधी गट म्हटल्यास योग्य ठरेल) कार्यकर्त्यांनी गुरूवारी महावितरण कंपनीच्या कार्यालयात भारनियमनाविरोधात आंदोलन सुरू केले. हे आंदोलन नाही, आम्ही फक्त चर्चा करायला गेलो होतो, अशी सारवासारव त्यांनी नंतर केली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीपर्यंत जायचा तो मेसेज गेला होता. डागवाले यांच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या आंदोलनाच्या संकल्पनेमुळे खासदार दिलीप गांधी यांची ‘इमेज’ पक्षात मात्र डागळली. तसेही गांधी विरोधकांनी ती बातमी ज्यांच्यापर्यत पोहोचवयाची होती, त्यांच्यापर्यंत पोहचविली.
दिलीप गांधी यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत भाजपाविरोधात मोर्चा काढल्याचे कधी ऐकिवात नाही. पहिल्यादांच गांधी भाजपाविरोधात तेही सत्तेत असताना रस्त्यावर उतरले. त्यांच्या डोक्यात हे खूळ भरविले कोणी? हे न समजण्याइतपत नगरकर वेडे नक्कीच नाही. गांधीही त्याला बळी पडेल याचे दु:ख भाजपातील अन्य मंडळींना झाल्याचे चर्चेत सहजपणे जाणवतेही. ज्या पक्षात डागवाले गेले तेथे फार काळ रमले नाही. इथं किती दिवस रमणार असा सूर त्यावेळीच गांधी विरोधकांनी आळवला होताच याचे स्मरण आजही नगरकरांना आहेच.

भाजपात प्रवेश करण्यामागे किशोर डागवाले यांचे स्वत:चे काही मनसुबे आहेत. महापौर, आमदारकीचे स्वप्न त्यांना पडू लागले असल्याची चर्चा आहे. अर्थात लोकशाही देशात ते डिपेंड ऑन व्होट. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्षाचा काही डिसीप्लेन आहे. ते तर अगोदर फॉलो करा मग सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करा असा सल्ला डागवाले यांना नगरातील ज्येष्ठांकडून दिला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. असो डागवाले नावाचे इतिहासपुराण उगळण्यापेक्षा खासदार दिलीप गांधी यांनी त्यातून धडा घेऊन शहाणे व्हावे हीच भाजपवासियांची अपेक्षा दुसरे काय!

 

LEAVE A REPLY

*