अहमदनगर : ऑनलाईनमुळे बाजार बसला!

0

व्यापारी चिंतेत ग्राहकांच्या प्रतीक्षेत

अहमदनगर : गर्दीत खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या इंटरनेटच्या साह्याने ऑनलाईन खरेदी करण्यावर यंदा तरूणाईने जोर दिला आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर खरेदीच्या माहोलात ग्राहकांकडून एक कोटीपेक्षा अधिक रुपयांची खरेदी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या ऑनलाईन खरेदीचा फटका नगरच्या बाजारपेठेला बसला आहे. त्यातच कंपन्यांनी ऑनलाईन खरेदीवर घसघशीत सुट दिल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात तिकडे आकर्षित झाला आहे.

अ‍ॅमेझॉन, फिलअप कार्ट, स्नॅपडिल, मंत्रा सारख्या ऑनलाईन कंपन्यांनी खरेदीवर घसघशीत सूट दिली आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. मोबाईल कंपन्यांनीही फ्री डाटा, कॉलिंग फॅसिलिटी दिल्याने इंटरनेट वापरणे स्वस्त झाले आहे. सोशल मिडियामुळे ऑनलाईन खरेदीची सवलतीचा प्रसार, प्रचार सुरू आहे. नगर शहरात पडणार्‍या रोजच्या पावसाने बाजारपेठेत चिकचिक झाली आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यावरील दलदल अन् बाजारपेठेतील गर्दीत होणारी घालमेल याला कंटाळून अनेकांनी ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडला आहे. घरबसल्या खरेदी करता येत असल्याने अनेकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले आहे. देशात इंटरनेटचा वेग वाढल्यामुळे, अधिकाधिक लोक इंटरनेटच्या वापराला सरावल्यामुळे तसेच इंटरनेटचा प्रसार छोट्या शहरांपर्यंत झाल्यामुळे ऑनलाइन खरेदीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. स्मार्टफोनच्या वापरात झालेली वाढही याला कारणीभूत झाली आहे.
ऑनलाइन खरेदीमध्ये यंदा मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ग्राहकोपयोगी वस्तू, कपडे व घरगुती वापराच्या वस्तू यांना सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र आहे.
ऑनलाईन कंपन्यांचे डिलेव्हरी बॉय दिवसभर पार्सल पोहच करण्यात गुंतले आहेत. दिवसाकाठी शेकडो वस्तुंचा डिलेव्हरी करावी लागत असल्याने ‘पॅक’ असल्याचे डिलेव्हरी बॉयने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याच डिलेव्हरी बॉयकडून नगरमधील ऑनलाईन खरेदीची आकडेवारी ‘नगर टाइम्स’ला मिळाली. ही आकडेवारी थक्क करणारी आहे. दिवसभरात मी शंभर डिलेव्हरी पोहच करतो. एक डिलेव्हरी 500 रुपयांच्या खाली नसते. म्हणजे एक डिलेव्हरी बॉय दिवसभरात 50 हजार रुपयांची खरेदी घरपोहच करतो आहे. एका कंपनीचे किमान पाच डिलेव्हरी बॉय आहे. साधारणत: नगरकर दिवसभरात किमान अडीच लाख रुपयांची ऑनलाईन खरेदी (एकाच कंपनीची) करतात. गत पंचवीस दिवसांतील ऑनलाईन खरेदीचा हा आकडा एक कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा आहे.
ऑनलाईन खरेदीचा फटका नगरच्या बाजारपेठेला बसला आहे. जीएसटी तसेच माल ने-आण करण्याचा खर्चाची बेरीज पाहता ऑनलाईन खरेदीपेक्षा नगरच्या बाजारपेठेत वस्तू महाग मिळतात. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदीकडे वळाले आहेत.
ऑनलाईन खरेदीची गॅरंटी नसते. आम्ही व्यापारी येथेच आहोत, माल खराब निघाला किंवा बिघाड झाला तर त्याची जबाबदारी आमची आहे, असा विश्‍वास देऊन व्यापारी माल विक्रीचा फंडा अवंलबित असल्याचे चित्र बाजारपेठेत पहावयास मिळाले. दिवाळी पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरीही दुकानात समाधानकारक ग्राहक नाहीत. कोट्यवधी रुपयांचा माल भरून ठेवला, आता तोच वर्षभर विकावा लागेल अशी खंत व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.

नोटाबंदीनंतर बँकेतून रोकड काढण्यावर असलेले निर्बंध अन् एटीएममध्येही नोटांची टंचाई यामुळे लोकांच्या हातातून रोकड गायब झाली आहे. गरजेपुरतीच रोकड असल्याने आवश्यक तीच खरेदी केली जाते. अनेक कंपन्या, कारखान्यांनी अजूनपर्यंत बोनस दिलेला नाही. परिणामी बाजारपेठेतील उलाढाल कमालीची मंदावली आहे. नोटाबंदीनंतर अनेक दिवस ठप्प असलेली बाजारपेठ आता ऑनलाईन खरेदीने अडचणीत आली आहे.

ऑनलाईन खरेदीचा फटका बसला हे खरं असलं तरी मालाची गॅरंटी आमच्याकडे असल्याने आजही ग्राहक खरेदीसाठी येतात. त्यांची संख्या मात्र घटली. यापूर्वी कधी अशी परिस्थिती नव्हती.
– सागर कराचीवाला, कराचीवाला इलेक्ट्रॉनिक्स

 

 

 

नगरच्या बाजारपेठेत जाण्यासाठी रस्ते धड नाहीत. गर्दी खूप असते. त्यामुळे ऑनलाईन खरेदीलाच मी प्राधान्य देते. किरकोळ वस्तू खरेदी करण्यापुरतीच बाजारपेठेत जाते.
– सलोनी उपाध्ये, नालेगाव

 

 

 

 

शिक्षण, घरात मदत यामुळे बाजारात खरेदीला जाण्यास वेळच मिळत नाही. घरबसल्या खरेदी करणेच सोपे जाते. ऑनलाईन खरेदीवर मोठी सूट मिळते. बार्गेनिंग करण्याची वेळ येत नाही. बाजारपेठ पायाखालून घालताना खूप वेळ जातो.
– अनन्या मिसाळ, बालिकश्रम रस्ता

LEAVE A REPLY

*