Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

मनपाच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

Share

आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांचे समायोजन लटकले ः अनुत्तीर्ण दहावीचे विद्यार्थीही चिंतेत

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेने माध्यमिक शाळा बंद केल्याने तेथे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेसाठी अर्ज कुठे दाखल करायचे असा प्रश्‍न आहे, तर आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी जिल्हा परिषदेकडे अद्याप महापालिकेने कागदपत्र सादर केलेली नाहीत.

महापालिकेने रेल्वेस्टेशन भागात माध्यमिक शाळा सुरू केली होती. मुळात ही शाळाच बेकायदेशीर असल्याचे महापालिका प्रशासनाचे मत आहे. शिक्षण मंडळावर ज्यावेळी सभापती आणि सदस्यांची सत्ता असायची, त्या काळात तत्कालीन सभापती सतीश धाडगे यांच्या पुढाकाराने ही शाळा सुरू झाली. मात्र ती करताना आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नाही. तेथे नियुक्त केलेले शिक्षक देखील धाडगे यांनी परस्पर निश्‍चित केल्याचे सांगण्यात येते. काहींना आठ तर काहींना सहा हजार मानधन निश्‍चित करून या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.

असे असले तरी नियुक्त केलेल्या शिक्षकांनी आपले काम इमाने इतबारे करत आठवी, नववी आणि दहावीसाठी विद्यार्थी संख्या वाढण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले. गेल्या आठ-दहा वर्षांत दहावीचा निकाल चांगला लागेल, यासाठीही प्रयत्न केले. या शाळेमध्ये आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब असलेल्या कुटुंबातील मुले, मुली शिक्षण घेतात. सातवीनंतर शाळा सोडलेली अनेक मुले या शाळेत शिक्षणासाठी आणली होती. गेले आठ-दहा वर्षे येथील शिक्षकांना मानधन देखील देण्यात येत होते. या शिक्षकांना कायम करण्याचा विषय ज्यावेळी समोर आला, त्यावेळी अनेक ‘उद्योग’ झाले. त्यातून ही शिक्षक भरतीच अनधिकृत असल्याचा शोध लावण्यात आला. त्यानंतर या शिक्षकांचे मानधन थांबविण्यात आले.

माध्यमिक शाळेवर नियंत्रण ठेवण्यात महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकार्‍यांनीही असमर्थता दर्शविली. त्यामुळे ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मागील सहा महिन्यांपासून यासाठी हालचाली सुरू होत्या. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ही शाळा बंद करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र देऊन आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र शाळा सुरू होऊन दोन दिवस झाले तरीही समायोजनासाठी आवश्यक कागदपत्रे महापालिका शिक्षण मंडळाने अद्याप दिलेली नाहीत.

महापालिकेची शाळा बंद करण्यात आल्यामुळे येथील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत वर्ग करावेत, असे पत्र महापालिकेचे जिल्हा परिषदेला हवे आहे. तसेच किती विद्यार्थी समायोजित करायचे, याची यादी देखील हवी आहे. ही माहिती अद्याप महापालिकेकडून देण्यात आली नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे.

दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दाखले हवे आहेत. तसेच जे अनुत्तीर्ण झाले, त्यांना लगेच पुन्हा परीक्षा देण्याची संधी असल्याने त्यासाठी परीक्षा अर्ज दाखल करावयाचे आहेत. हे काम शाळेमार्फत करणे विद्यार्थ्यांना सोयीचे आहे. विशेषतः बहुतांश विद्यार्थी झोपडपट्टीतील असल्याने इतरत्र जाऊन ते हे अर्ज दाखल करू शकत नाहीत. मात्र शाळाच बंद केल्याने तेथे कोणीच कर्मचारी नसतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही पुढील परीक्षा देता येईल की नाही, याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पालकांनी मंगळवारी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेऊन या संदर्भात दाद मागितली.

कर्मचार्‍यांना बंदी – माध्यमिकच्या वर्गांना शिकविणारे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची मानधनावरील सेवा रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दाखल करण्यासाठी तसेच दाखले देण्यासाठी देखील या शाळांमध्ये जाण्यास बंदी करण्यात आली आहे. आपण तेथे गेलात तर सर्व जबाबदारी आपल्यावर निश्‍चित करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे मुख्याध्यापकांना सांगण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!