खंडपीठाच्या दणक्यामुळे मनपाची घाईघाईत सभा
Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिल्यानंतर तातडीने भूसंपादनाच्या विषयासाठी महापालिकेने सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. मंगळवार दि. 22 रोजी ही सभा होत आहे.
तपोवन रस्ता परिसरात असलेली एक जागा रस्ता रूंदीकरणासाठी ताब्यात घ्यावयाची आहे. यासाठीचा मोबदला देण्याबाबत महापालिका गेल्या अनेक महिन्यांपासून टाळाटाळ करत आहे.
प्रशासन या गोष्टीला तयार असले, तरी सर्वसाधारण सभेत हा विषय प्रत्येकवेळी टोलवला जात आहे. यापूर्वीही एकदा खंडपीठाने याबाबत ताशेरे ओढले होते. असे असतानाही मोबदला देण्याबाबत व इतर बाबींबाबत शासनाचे मत मागवावे, असे सांगत हा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला. खंडपीठाने याची गंभीर दखल घेत, शासनाकडे निर्णयाची अपेक्षा करता, तुम्ही सक्षम नाही का, असा खडा सवाल केला.
तसेच याबाबत काय तो अंतिम निर्णय घेऊन 22 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत न्यायालयाला माहिती द्या, असा आदेश दिला. त्यामुळे आचारसंहिता असतानाही दि. 22 विशेष सभा आयोजित करून हा एकमेव विषय सभेपुढे घेण्यात आला आहे. भूसंपादन करायचे की नाही, अन करायचे झाल्यास मोबदला देणे असा हा विषय आहे.