माजी महापौरांना शोधावा लागणार सुरक्षित मतदारसंघ

0
अहमदनगर(प्रतिनिधी)- महापालिका सांभाळू पाहणारे सगळ्याच पक्षाचे कॅप्टन वॉर्ड रचनेत होमग्राउंड हरवून बसले आहेत. आता या कॅप्टनसाठी ‘सेफ’ वॉर्डाची शोधाशोध सुरू झाली आहे. आजपर्यंत महापालिकेत नेतृत्व केलेल्या माजी महापौरांना नव्या वॉर्ड रचनेचा फटका बसला.
शिवसेनेच्या विद्यमान महापौर सुरेखा कदम, माजी महापौर शीला शिंदे, भगवान फुलसौंदर, राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांची कोंडी झालीय. नव्या फळीतील फेस शोधून त्यांच्याकडे महापालिकेचे कॅप्टन म्हणून धुरा सोपविली जाणार आहे. त्या कॅप्टनचा शोध सुरू झाल्याची माहिती विविध पक्षांतील सूत्रांनी दिली. महापौरपद ओपन असल्याने या शोध मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे महापालिकेवर झेंडा फडकावून विधानसभेचे मैदान मारण्याची चाल राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप खेळणार आहेत. महापालिका ताब्यात असल्यामुळेच संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली, हे ध्यानात घेत राजकीय डावपेच टाकले जात आहेत.
राष्ट्रवादीकडे कुमारसिंह वाकळे, अभिषेक कळमकर, अविनाश घुले, शिवसेनेकडे अनिल शिंदे, संभाजी कदम, दिलीप सातपुते, सचिन जाधव, भगवान फुलसौंदर, भाजपकडे सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले, गीतांजली काळे, बाबासाहेब वाकळे यांच्याकडे कॅप्टन म्हणून पाहिले जाते.
या सगळ्याच कॅप्टनचे ग्राउंड ‘रेड झोन’च्या रेषेने व्यापले आहेत. एकतर या कॅप्टनसाठी ‘सेफ झोन’ शोधावा लागेल किंवा नवाच कॅप्टन सगळ्याच पक्षाचा शोधावा लागणार आहे. मात्र महापालिकेचा कॅप्टन हा ओपन असल्याने अनेकांनी त्याच दृष्टीने पक्ष बळकट करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

कदम, शिंदे, कळमकर, फुलसौंदर यांची होणार धावपळ
विद्यमान महापौर सुरेखा कदम यांचा प्रभाग तुटला असून त्यांच्या वॉर्डाला किशोर डागवाले, सुवेंद्र गांधी, मनेष साठे यांचा भाग जोडला गेला आहे. शीला शिंदे या माजी महापौरांच्या वॉर्डाचा पुरता पचका झालाय. थेट केडगावपर्यंत विस्तारलेला वॉर्ड शिंदे यांची दमछाक करणारा ठरणारा आहे. भगवान फुलसौंदर यांच्या वॉर्डालाही राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व फुलसौंदर यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गणेश भोसले यांचे प्राबल्य जोडल्याने त्यांचीही कोंडी झालीय. अभिषेक कळमकर यांच्या वॉर्डाचे रचनेत तिरपांगडे झालेय. हडकोपासून ते थेट भिस्तबाग चौकापर्यंत त्यांना पायपीट करावी लागणार आहे. शिवाय बहुतांश भाग हा त्यांच्यासाठी नवखा असणार असल्याने त्यांनाही मेहनत घ्यावी लागणार आहे.

पक्ष उमेदवारांच्या अन् उमेदवार पक्षाच्या शोधात
अगडबंब वॉर्ड पडल्याने पक्षाच्या चिन्हाशिवाय निवडणूक शक्य नाही हे जाणून इच्छुकांनी पक्ष निवड फिक्स केली आहे. त्यासाठीची सेटिंगही सुरू झालीय. तर दुसरीकडे पक्षालाही मोठ्या वॉर्डात तगडा उमेदवार हवाय. पक्ष अशा तगड्या उमेदवाराच्या शोधात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दीपाली नितीन बारस्कर या पाईपलाईन रस्त्यावरील शिवसेनेच्या आणखी एक नगरसेविका. वॉर्ड रचनेत त्यांच्या वॉर्डाचा इस्कोट झालाय. त्यांचा वॉर्ड काँग्रेसचे निखिल वारे यांच्याकडे गेलाय तर अर्धा भाग दिगंबर ढवण यांच्याकडे गेलाय. आता कोणत्या वॉर्डातून (अर्थात नवा एक नंबर की दोन) असे दोन पर्याय बारस्कर यांच्यासमोर असल्याची चर्चा आहे.

दिगंबर ढवण यांच्या रूपाने पाईपलाईन रस्ता भागात शिवसेना जिवंत होती. महाराजांनी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. आता नव्या राजकीय इनिंगमध्ये ते कोणता झेंडा खांद्यावर घेणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. आता महाराज जाहीर मेळावा घेऊन भूमिका घोषित करणार आहेत. नवा झेंडा खांद्यावर घेणार की ‘फिर वही दिल…’ याबाबत उत्सुकता आहे.

 

LEAVE A REPLY

*