महापालिकेतील घरगडी : पगार मनपाचा अन् काम पदाधिकारी-अधिकार्‍यांच्या घरात

0
आयुक्तसाहेब रेल्वे विभागाचा आदर्श घेणार कधी..?

अहमदनगर (प्रतिनिधी)- क्षमता असली तरी ते काम करण्याची नसलेली मानसिकता अथवा राबराब राबून काम करण्यापेक्षा खुशमस्करी करण्यातच धन्यता मानणारे महापालिकेचे बिगारी घरगडी म्हणून अधिकारी-पदाधिकार्‍यांच्या घरात वेठबिगारासारखे काम करत आहेत.

महापालिकेच्या पैशातून घरगडी मिळत असल्याने पदाधिकारी ओरड करत नाही अन् पदाधिकार्‍यांच्या दबावाखाली असणार्‍या अधिकार्‍यात कायदा अंमलात आणण्याची धमक नाही. महापालिकेतील या स्थितीमुळे महापालिका बिगार्‍यांची ओळख आता घरगडी म्हणून होऊ पाहत आहे. 

अधिकार्‍यांच्या घरी वेठबिगारासारखे काम करणार्‍या कामगारांची मुक्तता करणार्‍या रेल्वे खात्याचा आदर्श अहमदनगरची महापालिका घेणार का? असा प्रश्‍न शहरभर चर्चेला आला आहे.

अधिकारी व पदाधिकार्‍यांकडे घरगडी असणार्‍या बिगारीची सुटका करण्याचा निर्णय आयुक्त घनशाम मंगळे कधी घेणार अशी विचारणा एकमेकांकडे होऊ लागली आहे.

महापालिकेच्या अस्थापनेवर आज मितीला 1 हजार 969 कर्मचारी आहेत. अस्थापनेकडे 504 बिगारी असल्याची नोंद आहे.

यातील 400 बिगारी हे शहरातील उद्यानाची देखभाल, दुरूस्तीसाठी उद्यान विभागाकडे कार्यरत असल्याची नोंदही अस्थापना विभागाकडे आहे.

मात्र उद्यानाऐवजी बिगारी भलतीकडेच काम करत आहेत. पाणी पुरवठा, अतिक्रमण विभागाकडे काही बिगारी कार्यरत असले तरी त्यांची मूळ नियुक्ती ही उद्यान विभागात आहे.

महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकार्‍यांकडे घरकाम करणार्‍या बिगारीची नियुक्तीही उद्यान विभागात आहे.

मात्र नेमूण दिलेले काम करण्याऐजवी बिगारी कर्मचारीही घरगडी म्हणून घेण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. उद्यान विभागात नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांवर अंकुश ठेवण्याचे काम खरे तर विभागप्रमुखाचे.

पण त्यांचे कोणतेच नियंत्रण या बिगार्‍यांवर नाही. अधिकारी-पदाधिकार्‍यांकडे घरगडी म्हणून राबताना कोणताही त्रास होत नसल्याने घरकामातच या बिगार्‍यांना इंटरेस असल्याचे चित्र आहे.

काही बिगार्‍यांना मात्र हे काम अपमानास्पद असे वाटते, पण ईलाज नसल्याने त्यांना घरगडी म्हणून काम करावे लागते.

मंगळेसाहेब निर्णय घेणार की दिवस काढणार! –
वर्षानुवर्ष अधिकार्‍यांच्या घरी वेठबिगारासारखे काम करणार्‍या कामगारांचीही अधिकार्‍यांच्या जाचातून रेल्वेने मुक्तता केली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या घरी काम करणार्‍या 30 हजार ट्रॅकमनला पुन्हा कामावर रूजू होण्याचे आदेश रेल्वेने दिले. तसेच घर कामाला जुंपलेल्या सर्व कामगारांना कामावर रूजू होण्यासाठी घरकामातून मुक्त करण्याचे आदेशही रेल्वे मंत्रालयाने सर्व अधिकार्‍यांना दिले आहेत. रेल्वेसारखा धाडसी निर्णय महापालिका आयुक्त मंगळे कधी घेणार की ये रे माझ्या मागल्यागत तेही याकडे दुर्लक्ष करून दिवस काढणार याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

अस्थापना विभागाकडील नोंदी काही असल्या तरी उद्यान विभागातील बिगार्‍यांच्या इतरत्र बदल्या झाल्या आहेत. बागेतून परस्पर बिगारी पदाधिकारी, अधिकार्‍यांच्या घरी जात असेल तर माहिती नाही. 22 उद्यानं आणि 30 सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपन करून बागा तयार करण्यात आल्या आहेत. बिगारी नसल्याने खासगी ठेकेदारामार्फत उद्यानांची देखभाल केली जाते.
– गोयल, उद्यान विभागप्रमुख. 

 

LEAVE A REPLY

*