Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

‘स्थायी’त गोंधळ

Share

सानुग्रहसाठी महापालिका कर्मचार्‍यांचा ठिय्या

अहमदनगर (प्रतिनिधी) – शांततेच्या मार्गाने न्यायहक्कासाठी लढा देणार्‍या महापालिका कर्मचार्‍यांच्या आंदोलनाकडे प्रशासनाने डोळेझाक केली. पदाधिकारीही आंदोलकाकडे फिरकले नाहीत. सनदशीर मार्गाने प्रश्न सुटणार नाही अशी खात्री पटल्याने कर्मचार्‍यांचा पारा आज (सोमवारी) चढला. संघटनेने महापालिका बंद करत थेट स्थायी समितीच्या सभेत घुसखोरी केली. प्रचंड घोषणाबाजी करत सभाही बंद पाडली. तेथेच ठिय्या मांडला. कर्मचार्‍यांच्या आक्रमकतेसमोर सभापती हतबल झाले, अन् त्यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय जाहीर केला. तोडग्यासाठी कलेक्टरांनी तातडीने बैठक बोलविली. वृत्त लिहीपर्यंत कलेक्टरांकडे सुरू असलेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला नव्हता.

महापालिका कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान अन् 103 कर्मचार्‍यांना पदोन्नती द्यावी यासाठी शुक्रवारपासून कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी महापालिका अधिकार्‍यांनी आंदोलन बेदखल केले. त्यामुळे कर्मचारी संघटनेने सोमवारी आक्रमक होण्याचा निर्णय घेतला. त्यातच आज (सोमवारी) स्थायी समितीची सभा होती. सभा सुरू होताच कर्मचारी कामकाज बंद करून एकवटले.शे-दोनशे कर्मचारी थेट स्थायी समितीच्या सभागृहात घुसले. प्रचंड घोषणाबाजी करत कर्मचार्‍यांनी तेथेच ठिय्या दिला. सभापती बाबासाहेब वाकळे अन् संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी कर्मचार्‍यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत सानुग्रह अनुदान अन् पदोन्नतीच्या फाईलवर सही होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेत कर्मचार्‍यांनी ठिय्या दिला.

दिवाळी तोंडावर आलीय. आयुक्तांनी निवड समितीच्या निर्णयाला तसंच सानुग्रह अनुदान देण्यास सहमती दिली. पण महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सानुग्रह अनुदानासंदर्भात आर्थिक कारण पुढं करत आयुक्तांची दिशाभू केली. महिन्यापासून पदोन्नतीची फाईल घोळवत ठेवल्याचा आरोप संघटनेने केला. सभापती वाकळे यांनी तेथूनच कलेक्टर तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क साधला. कलेक्टर व्हिसीत असल्याने व्हिसी संपताच बैठकीचे आश्वासन त्यांनी दिलं. कलेक्टरांच्या बैठकीसाठी अधिकारीही तिकडे निघाले. त्यामुळं सभा तहकूब करण्याचा निर्णय सभापती बाबासाहेब वाकळे यांनी घेतला. तहकूब सभा आज दुपारीच चार वाजता होणार असल्याची माहिती सभापती वाकळे यांनी दिली.
…………
झारीतील शुक्राचार्य कोण?
पगार, सानुग्रह, उचलसाठी आक्रमक होतात. ठेकेदारही देयकासाठी महापालिकेत खेट्या घालतात. त्यातच यंदा वसुली 50 कोटीवर पोहचल्याने सगळ्यांनाच ‘आशा’ लागलीय. कलेक्टर प्रभारी आयुक्त असल्याने त्यांच्या आदेशाशिवाय महापालिका प्रशासनाचं पानंही हालत नाही. प्रशासन ‘वरिष्ठ’कडं बोट दाखवून सुटका करून घेतात, नेमका दोषी कोण? हेच कोणाला कळत नाही. त्यामुळं कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्याचे समजते.

अ‍ॅडिशनल कमिशनरचे मौन..
पदोन्नतीची अन् सानुग्रहची फाईल्स कोणी अडविली? असा थेट प्रश्न विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी प्रशासनाला विचारला. त्यावर कॅफो मानकर यांनी आमच्याकडून फाइल्स वरिष्ठांकडे गेली आहे. त्यामुळं तो त्यांचा अधिकार असल्याचे सांगत अंग काढले. त्यानंतर बोराटे यांनी थेट अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडेंना ‘कलेक्टरांनी फाइल अडविली का? असा प्रश्न केला. मात्र वालगुडे यांनी कोणतेच उत्तर न देता मौन बाळगले. 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!