हिंदुत्ववाद्यांचा बेल-भंडार : मंदिर वही रहेंगे..

0

कोअर कमिटी जाणार कोर्टात, हिंदुत्ववादी नेत्यांवर टीका

चुकीच्या सर्व्हेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, कोअर कमिटीची स्थापना,
मंदिर बचावसाठी उपोषणाला सुरूवात

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोर्टाचा आदेशाचा आदर आम्ही करतो, मात्र चुकीच्या पध्दतीने सर्व्हे करून मंदिर पाडण्याची मोहीम महापालिका राबवित आहे. त्याचा निषेध करण्यासाठी झालेल्या बैठकीनंतरच तेथेच हिंदुत्ववादी संघटनांनी उपोषण सुरू केले. मंदिर पाडण्याच्या मोहिमेविरोधात कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेण्यासोबतच मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मंदिराला हात लावून तर बघा.. असा इशारा महापालिका प्रशासनाला या बैठकीतून दिला गेला. 

शहरातील रंगारगल्ली भागातील तुळजाभवानी मंदिरासमोर वसंत लोढा यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. दिंगबर गेंट्याल, सुहास मुळे, शिवाजी लोंढे, शिरीष लहाडे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीला हजेरी लावत महापलिकेच्या कारवाईचा निषेध केला. हिंदुत्ववादी नेता म्हणून मिरवून घेणारे गेले कोठे? एकानेही मंदिर पाडण्यास विरोध का नाही केला? असा सवाल करत नागरिकांनी राजकीय नेत्यांच्या वागणुकीचा निषेध केला.

शहरातील मंदिरांचा सर्व्हे चुकीचा झाला. फेरसर्व्हे करावा यासाठी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आजपर्यंत झालं ते पुरे. यापुढे शहरातील एकाही मंदिराला हात लावू देणार नाही. मंदिर बचावसाठी जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती वसंत लोढा यांनी दिली.

हिंदू राष्ट्र सेनेचे दिगंबर गेंट्याला यांनी महापालिकेने पाडलेले मंदिर पुन्हा बांधण्याचा सांगत पाडापाडी करणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. महापालिकेच्या जागेत असलेली धार्मिक स्थळं का पाडली नाही असा सवाल करत मोहीमेविरोधात कोर्टात याचिका दाखल करून अधिकार्‍यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा गेंट्याला यांनी दिला.

मंदिर बचावासाठी शहरातील नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असून न्यायालयाच्या आदेशाचा आदर आहे पण तो फक्त हिंदूनीच पाळायचा का असा सवाल शिवाजी लोंढे यांनी केला. शहरातील प्रत्येक गल्लीत सायंकाळी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. महापालिका, राज्य अन् देशात भाजपची सत्ता आहे. मग स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारे नेते आता कुठं गेले असा सवाल करत त्यांनी हिंदुत्ववादी नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

15 जणांची कोअर कमिटी करून चुकीच्या सर्व्हेबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाणार आहे. ही कोअर कमिटी कोर्टात स्वतंत्रपणे याचिका दाखल करेल. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन फेरसर्व्हे करावा अशी मागणी करणार असल्याची माहिती शिरीष लहाडे यांनी दिली.

बैठकीनंतर महिला तसेच विविध संघटनांच्या सुमारे 70 जणांनी जागेवरच उपोषण सुरू केले. मोहीम थांबल्याशिवाय उपोषण मागे घेणार असा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाडापाडी मोहिमेला आता अडथळा निर्माण झाला आहे.

………………….
गौरीघुमट येथील तुळजाभवानी मंदिर अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत आहे. या मंदिराला हात लावून तर बघा असा इशारा वसंत लोढा यांनी दिला.
…………….
आजपर्यंत 17 मंदिर पाडली. त्यात हिंदुचीच धार्मिक स्थळं आहेत. इतरांची का नाही असा सवाल करत यापुढे मंदिर पाडू दिले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
……………
हिंदुत्ववादी संघटनांच्या या पावित्र्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. 102 धार्मिक स्थळं पाडली जाणार आहे. 17 पाडल्यानंतरच ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

 

LEAVE A REPLY

*