उडी उडी रे…!

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- सक्रांत म्हटलं की महिलांचा सण. पण नगरात बच्चे, तरुणांना पतंगबाजीचा आंनदोत्सव देणारी ही पर्वणी. सक्रांतीच्या भल्या सकाळीच बिल्डींगचे टेरेस तरुणांनी तर आकाश पतंगांनी गजबजून जाते. दे ढिल…ओय कापे..च्या आरोळ्यांनी आसमंत दुमदुमून जातो.
पतंग, मांजा अन् चकरी खरेदीसाठी आजपासूनच झुंबड उडाली आहे. बांगडपट्टी अन् उपनगरातील चौकाचौकात पतंग विक्रीचे स्टॉल लागले आहेत. किरकोळ दुकानातही पतंग दिसू लागले आहेत. लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक नगरकर पतंग उडवण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र नेहमीच दिसते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पतंग खरेदीसाठी मंदावलेली गर्दीने भोगीला उच्चांक केला. बागडपट्टीतील दुकाने पतंगासाठी फेमस आहेत. तेथे तरुणांसह मोठ्यांनी धाव घेत मनपसंत पतंग खरेदी करत असल्याचे चित्र आहे.

बागडपट्टीत पतंगाची दुकाने सजली आहे. झेंडीगेट, माळीवाडा, केडगाव, प्रोफेसर कॉलनी, सावेडीसह केडगाव परिसर असणारी दुकाने विविध आकरांच्या पतंगांनी भरले आहे. बागडपट्टी परिसरात असणारे अनेक दुकाने लग्नाच्या मंडपाप्रमाणे सजविण्यात आली आहेत. प्रवेशद्वारावर व जवळपासच्या झाडांवर विविध रंगी, डिझाईनचे पतंग लावून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. काही नामंकित दुकानात लावण्यात आलेली पक्ष्यांच्या आकाराची, पतंगांच्या शेपटीवर झालर असलेल्या, कार्टून, अभिनेते व अभिनेत्रीच्या छबी असलेले पतंग प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र दिसत होते.

तिरंगा, गोंडा, सुरती अशा पारंपरिक पतंगांसह स्पायडरमॅन, छोटा भीम, डोरेमॉन, अँग्री बर्ड, सुपरमॅन, टॉम अ‍ॅण्ड जेरीच्या नव्या पतंग बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. तसेच नवीन प्लॉस्टिकच्या चमकणार्‍या पतंगाची खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनी पुढे असल्याचे चित्र आहे. बाजारात 5 रूपयांपासून ते 500 रूपयांपर्यंत पतंग बाजरात विक्रीसाठी यंदा उपलब्ध आहे.

पूर्वी पतंगप्रेमींचा कल धारदार मांजा खरेदीकडे असत. मात्र गेल्या काही वर्षापासून बरेली, पांडा, मैदानी, चायना आदी प्रकारचे तयार मांजाचे प्रकार रिळमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान अनेक मुलांकडून नायलॉनच्या चायना मांजाला पसंती मिळत आहे. चायना मांजात मोनोकाइट, जंबो, मोनो हीरो, मोनो फिल, ड्रॅगन हे प्रकार उपलब्ध आहेत. मांजा 60-70 रुपयांपासून ते हजार रूपयांपर्यंत तर चक्री 20 रूपयांपासून ते 200 रूपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. यंदा पंतग व मांजासाठी लागणार्‍या कच्चा मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे भाववाढ झाल्याचे चित्र बाजारात दिसून येत होते.
————–
राजकीय पक्षाच्या पतंग
पलास्टिक, कागदी आणि कापडी अशा तीन प्रकारात पतंग बाजारात विक्रिसाठी उपलब्ध आहेत. कापडी प्रकारात गरुड, फुलपाखरू, वाघ आकारांच्या तयार करण्यात आलेल्या पतंग पाहवयास मिळत आहे. यंदा विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यातच अनेक राजकीय पक्षाचे चित्र असलेल्या पतंगी बाजारात दाखल झाल्या आहेत. अनेक तरूणांनी आपल्या आवडत्या राजकीय पक्षाच्या पतंगी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांची लढत आता आकाशात होणार आहे.

मोबाईलमुळे नवपिढी दुरावली
आज पारंपारिक मनोरंजनाला मोबाईलचा पर्याय उपलब्ध झाल्याने बालगोपाळ त्यात गुरफटलेत. पतंगासारख्या जल्लोषी उत्सवापासून सध्याची पिढी दुरावत चालली आहे. मात्र, काहीजण प्रोढत्वाकडे झुकले असले तरी त्यांच्यातील लहानपणीचा ‘पतंगबाज’ मात्र कायम आहे.

चायना मांजा नको
दरवर्षी चायना मांजामुळे मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे जीव जातात तर काही गंभीर जखमी होतात. त्यामुळे मांजा खरेदी करतांना पारंपारिक पध्दतीने तयार करण्यात आलेल्या मांजा खरेदी करावा, असे आवाहन प्राणीमित्रांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*