मनपाचा चेक बाऊंस

0

पुन्हा अंधाराचे सावट, महावितरण धाडणार नोटीस

अहमदनगर : थकीत वीजबिलापोटी महावितरण कंपनीला महापालिकेने दिलेला 70 लाख रुपयांचा चेक बाऊंन्स झाला आहे. 70 लाख रुपये भरा अन्यथा वीज कट करण्याची नोटीस महावितरण कंपनी महापालिकेला धाडणार आहे. महापालिकेने पैसे न भरल्यास ऐन दिवाळीत नगर शहरातील रस्ते अंधारात बुडण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडे महावितरण कंपनीची सुमारे दीडशे कोटीची थकबाकी आहे. ती वादात असल्याने महापालिका पाणी पुरवठा आणि दिव्यांचे दरमहा वीजबिल भरते. मात्र पथदिव्यांचे बिल थकबाकीत गेले.

महावितरण कंपनीने पथदिव्यांची लाईट कट केल्याने शहरातील रस्ते अंधारात बुडाले. महापौर व पदाधिकार्‍यांनी मंत्र्यांना फोनाफोनी करून रस्त्यावर उजेड पाडला. त्याबदल्यात महावितरण कंपनीला 25 लाखाचे दोन व 70 लाखाचा एक असे तीन चेक दिले. त्यातील दोन चेक पास झाले. विजया बँक खात्यातील तिसरा 70 लाख रुपयांचा चेक न वटताच माघारी आला. त्यामुळे महापालिकेने महावितरण कंपनीला गोलमाल केल्याचे स्पष्ट झाले. आता महावितरण कंपनी महापालिकेला कायदेशीर नोटीस पाठविणार आहे. पैसे भरा अन्यथा वीज कट करण्याचे त्यात बजावले जाणार आहे. ऐन दिवाळीच्या काळात महापालिकेवर पुन्हा संकट कोसळणार आहे.

महापालिकेने दिलेला 70 लाख रुपयांचा चेक बाऊंस झाला आहे. तो क्लिअर करा अन्यथा वीज तोडण्याची नोटीस पाठविली जाईल. कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
– अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता, महावितरण.

LEAVE A REPLY

*