नगरमध्ये 362 वीजचोर !

0

महावितरणकडून 87 लाखांचा दंड  42 लाख वसूल  आकडेबहाद्दरांवर गुन्हे

अहमदनगर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातच आकडेबहाद्दर आहेत असे नव्हे तर खुद्द नगर शहरातही वीजचोर आहेत. या चोरांमध्ये घरगुती तसेच व्यावसायिकांचाही समावेश आहे. महावितरण कंपनीने जानेवारीपासून केलेल्या कारवाईत 362 वीज चोरीचे प्रकार समोर आले आहेत. ही चोरी पकडल्यानंतर संबंधितांना महावितरणकडून 87 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी 42 लाख रुपयांचे वसूलही केले. दंड न भरणार्‍या शिरजोर चोरांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नगरमध्ये वीज वितरणचे शहर आणि ग्रामीण असा भाग आहे. यात नगर शहर, उपनगरे आणि नगर तालुका आणि पारनेर तालुक्याचा समावेश आहे. यासाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. नगर शहर आणि ग्रामीणमध्ये वीज वितरणचे 1 लाख 53 हजार 157 वीज ग्राहक आहेत. यात 18 हजार 370 व्यवसायीक, औद्योगिक 3 हजार 497, शेती 49 हजार आणि उर्वरित घरगुती ग्राहकांचा समावेश आहे.
नगर शहर आणि ग्रामीणमध्ये ग्राहकांकडून दर महिन्याला 18 कोटी वीज बिलाची वसूल आवश्यक आहे. यात दर महिन्याला कमी जास्त प्रमाण होत असते. वाणिज्य, औद्योगिक आणि घरगुती अशा ग्राहकांचे एप्रिल 2017 अखेर 8 कोटी 50 लाख रुपये आणि महापालिकेकडील पथदिव्याच्या वीज बिलापोटी 9 कोटी असे 17 कोटी 50 लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती वीज वितरणकडून देण्यात आली.
शहर व ग्रामीण मिळून 328 फीडर आहे. यात 30 टक्क्यांपेक्षा जास्त गळती 14 फीडरवर आहे. त्या ठिकाणी जादा लोड शेंडींग करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच थकबाकी आणि वीज गळती असणार्‍या फीडरवर अधिक लोड शेडींग टाकण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
जानेवारीपासून नगर शहर विभागात महावितरणने 362 वीज चोरांचे प्रकार उघड केले आहेत. यातून वीज चोरांना 87 लाख रुपयांचा दंड करण्यात आला असून यातील 42 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित दंड वसूल करण्यासाठी पोलीसात गुन्हे नोंदवण्यात आले असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

मनपा सर्वात मोठा थकबाकीदार

 महापालिका हद्दीत पथदिव्याचे एका वर्षाचे वीज बिल 5 कोटी रुपये आहे. मात्र, मनपाने आतापर्यंत अवघे दीड कोटी रुपये वीज वितरणला अदा केलेले आहे. या दोन महिन्यांत 50 लाख रुपये मनपाने वीज वितरणकडे दिलेले आहेत. मनपा पाणी पुरवठ्याचे 150 कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. गेल्या महिन्यांत वीज वितरणने मनपाचे वीजजोड तोडले होते. मात्र, त्यानंतर मनपाकडून वीज वितरणला 82 लाख रुपयांचे पोस्ट डेटेड चेक दिल्याने पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*