धडाम धूम..

0

के के रेंजवर युद्धाचा थरारक सराव

अहमदनगर (प्रतिनिधी) – हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूवर तुटून पडलेले पायदळाचे जवान… अजस्त्र रणगाड्यांतून बॉम्बचा बेछूट मारा…. शत्रूच्या बंकरवर जाऊन आदळणारे मिसाइल.. तोफगोळ्यांचा दणदणाट… धुळीच्या लोटातून वाट काढणारे रणगाडे व सैनिक… आणि हे सर्व कुतुहलाने पाहणारे नागरिक व देश-विदेशातून आलेले पाहुणे… असे चित्र सोमवारी के. के. रेंजमध्ये होते.

येस… टार्गेट कम्प्लीट…
नगरपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर लष्कराचे के. के. रेंज हे युद्ध सराव क्षेत्र आहे. सैनिकी शिक्षण पूर्ण केलेल्या जवानांना रणगाडे चालविण्याचे तसेच प्रत्यक्ष युद्धस्थितीचे प्रशिक्षण येथे दिले जाते. दरवर्षी वार्षिक युद्धसराव आयोजित केला जातो. भारतीय लष्कराच्या ताकदीचे प्रात्यक्षिक या निमित्त आयोजित युद्ध सरावाच्या निमित्ताने दाखविले जाते. देशविदेशातील वरिष्ठ लष्करी अधिकारी व त्यांचे कुटुंबिय या वेळी उपस्थित असतात.

या युद्ध सरावाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यास नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. के. के. रेंजमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजता युद्धाच्या प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. आपल्याकडील अत्याधुनिक युद्ध साहित्य आणि वाहनांची माहिती देत त्यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शत्रूचा मुकाबला करण्यासाठी लष्कर कसे सज्ज आहे, हे पाहून प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलली.

टी-90 अर्जूनच्या भेदक मार्‍याने विदेशी पाहुणे चकीत!
रणगाड्यांमधून डागण्यात येणारे तोफगोळे, लक्ष्याचा घेतला जाणारा अचूक वेध, पायदळाचे चित्तथरारक युद्ध कौशल्य, आकाशात घिरट्या घालून जमिनीवरील लक्ष्यावर अचूक मारा करणारी लढाऊ विमाने, तोफगोळे डागणारे रणगाडे अशी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली.

मेजर जनरल निरज कुमार व ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रह्मणम यांच्या मार्गदर्शनाखाली एसी सेंटर अँड स्कुल व मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर (एमआयआरसी) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा युद्ध सराव वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांसह निमंत्रित नगरकर आणि देश-विदेशातील पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये झाला. सरावाचे मुख्य आकर्षण हे टी-90, अर्जुन, प्रकारातील रणगाडा ठरला. या रणगाड्याद्वारे सोडण्यात आलेल्या मिसाइलने डोळ्याची पापणी लवण्याच्या आत शत्रूचे बंकर नष्ट केले.

 

LEAVE A REPLY

*