Type to search

आवर्जून वाचाच गणेशोत्सव सार्वमत

वाजत-गाजत गणराज आले..

Share
अहमदनगर(प्रतिनिधी) – ढोल-ताशांचा नाद.. गुलाल-फुलांची उधळण…फटाक्यांची आतषबाजी आणि गणपती माझा नाचत आलाचा जयघोष…. अशा भक्तीमय वातावरणामध्ये आज (गुरूवारी) घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. दरम्यान सोशल मीडियातही गणोशोत्सवाला बहर आला असून, घराघरात आणि मंडळांनी सायंकाळी उशिरापर्यंत प्राणपतिष्ठा केली.
कालपासूनच बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होती. शहरातील कल्याण रोड, कुंभार गल्ली, चितळे रोड, गांधी मैदान, माळीवाडा, केडगाव, भिंगार, पाईपलाईन रोड, प्रोफेसर कॉलनी, सावेडीसह विविध भागात गणपती मूर्तीचे स्टॉल लावण्यात आले होते. श्री प्रतिष्ठापनेसाठी लागणार्‍या साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठा गर्दींने फुलल्या होत्या. ठिकठिकाणी असणार्‍या गणपतीच्या कारखान्यातून नगरकर गणपती बाप्पा मोरया… जयघोषात गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात होते.

दरम्यान शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात सकाळी 9 वाजता जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी माळीवाडा देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, अशोक कानडे, पंडीत खरपुडे, पांडुरंग नन्नवरे, रामकृष्ण कोथिंबीरे, बाबासाहेब सुडेक, डिवायएसपी संदीप मिटके, पुनम पाटील,कोतवालीचे पीआय नितीनकुमार गोकावे यांच्यासह मोठ्या संख्याने भाविक उपस्थित होते. प्रतिष्ठापना केल्यानंतर ढोलपथकाने स्थीर वादन केले. श्री विशाल गणपती मंदिरात दर्शन घेण्यासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती.

शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व सौ. आभाकिरण शर्मा यांच्या हस्ते श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, संगमनाथ महाराज, पंडितराव खरपुडे, अशोक कानडे आदींसह विश्‍वस्त.

मंडळाची संख्या घटली
प्रशासनाने मंडप उभारण्यासाठी कडक नियम लागू केले आहे. ध्वनिप्रदूषण केल्यानंतरही गणेश मंडळांच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. प्रशासनाच्या नियमांमुळे यावर्षी गणेश मंडळांच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यावर्षी मंडळाची संख्या घटल्याचे शहरात पाहवयास मिळत आहे.

डीजेला बायबाय
शहरातील अनेक गणेश मंडळे वाजत गाजत गणेशाचे स्वागत करत होते. ठिकठिकाणी पारंपारिक वाद्य, ढोल पथके, बॅण्ड सह हलगी पथकासह अनेक वाद्य वाजवली जात होती. तसेच अनेक मंडळानी डिजिटल बँण्ड लावत डिजेला फाटा दिल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

चार हजार पोलीस अन् सीसीटीव्हीचा वॉच
गणेश उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात व शहरात जवळपास 4 हजाराहून जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षितता म्हणून शहरात 150 पैक्षा जास्त सीसीटिव्ही लावण्यात आले आहे. यावर्षी गणशोत्सव व मोहरम एकत्र असल्याने प्रशासनाने शहरातील गर्दीच्या ठिकाणी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शिवाय एसआरपीएफच्या तुकड्याही मागवण्यात आल्या आहेत. तसेच दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, फोर्स वनच्या तुकड्याही सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून शहरात येणार्‍या गाड्यांची तपासणीही करण्यात येत आहे. आज दिवसभर होणार्‍या आगमनाच्या मिरवणुकीसाठी ट्रॅफिक पोलिसांकडून नियोजन करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!