नगरसेवक पुत्राला बदडले

0

मुकुंदनगर, गोविंदपुरातील घटना; मोहरम वर्गणी न दिल्याचा राग

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरमसाठी वर्गणी न दिल्यामुळे एका नगरसेवकाच्या मुलास बांधुन मारल्याची धक्कादायक घटना भिंगार परिसरातील गोवींदपुरा येथे घडली. आरोपींनी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र ही रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नगरसेवक फयाजोद्दीन अजीजोद्दीन शेख (रा. मुकुंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आठ जणांवर भिंगार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहीबाज मोहंमद उर्फ भगार, व शोएब यांच्यासह अनोळखी आठ जणांना आरोपी करण्यात आले आहे.
शनिवारी (दि.30) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नगरसेवक फयाजोद्दीन शेख यांचा मुलगा फरहान हा एका किराणा दुकानासमोर उभा होता. यावेळी आरोपींनी त्यास जवळ बोलावून एका दुचाकी वाहनावर बळजबरीने बसविले. त्यास दमदाटी करीत गोवींदपुरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर नेण्यात आले. दरम्यान तेथील झुडपांमध्ये दडून बसलेल्या सात ते आठ जणांनी अचानक बाहेर येवून फरहानला पकडले. त्यातील एकाने मोहरमसाठी 25 हजार रूपयांची मागणी केली होती. त्यातील 7 हजार रूपये दिले होते. मात्र, त्यांनी बाकी 18 हजारांची मागणी केली. ही रक्कम देण्यास फरहान ने नकार दिला असता आरोपींनी त्याचे हातपाय बांधून लाकडी दांड्याने दंडावर मारहाण केली. व पैसे देण्यास तगादा लावला. हा प्रकार उघड झाल्यानंतर नगरसेवक फयाजोद्दीन शेख यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सोमवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवडे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*