VIDEO : आंदोलक-पोलिसांत जुंपली

0
अहमदनगर ( प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून शेतकरी संप अधिकच तीव्र झाला आहे. शेतकर्‍यांनी दुधाचे टँकर, भाजीपाल्याची वाहने अडवली. रविवारी रात्री पोलीसांनी शेतकरी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्यासह 100 जणांवर गुन्हा नोंदवत त्यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणार्‍या 16 जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

नगर-औरंगाबाद रस्त्यावर वडाळा बहिरोबा येथे आंदोलन करणारे माजी आमदार शंकरराव गडाख यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथे आंदोलनाचे वार्तांकन करणार्‍या एका पत्रकाराला बेदम मारहाण केली आहे.

व्हिडियो : माजी आमदार शंकरराव गडाख यांना अटक

रविवारी नाशिकमध्ये झालेल्या शेतकर्‍यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मुख्यमंत्री सर्व मागण्या पूर्ण करीत नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करीत आणखी चार दिवस संप सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला होता. त्यानंतर, काही तासांतच नगरमधील वातावरण तापायला सुरुवात झाली. रविवारी रात्री 10 च्या सुमारास आष्टीहून दुधाचे काही टँकर पोलीस बंदोबस्तात पुण्याच्या दिशेने निघाले होते. टाकळी खातगाव टोल नाक्यावर शेतकरी आणि शिवसनेच्या काही कार्यकर्त्यांनी हे दूधाचे हे टँकर अडवले. पोलीसांच्या रायफलसह कोकटे यांच्या गाडीचे फोटो काढणारे पत्रकार शेख यांना पोलिसांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. याच दरम्यान, कोकाटे फरार झाला. पोलीसांनी शेख याला उचलून नगरला आणले. तसेच मारहाण केली. रात्रभर शेख यांना पोलीस ठाण्यात डांबून टेवले. रात्री उशीरा सेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक अशोक मरकड यांच्या फिर्यादीवरून दुधाचे टँकर फोडणे, दूधाची नासधूस करणे, दूध टँकर चालकांला मारहाण करणे आदी कलम अन्वये त्यांच्या गुन्हा दाखल केला असून गाडे, सुभाष बोरूडे आणि अन्य दोघांना रात्रीच अटक करण्यात आली आहे. यासह पोलीसांनी एमएच 16 बीएच 7589 ही कारही ताब्यात घेतली आहे.

सोमवारी सकाळी बाजार समितीच्या भाजीबाजार आणि शहरात अन्य भागात प्रहार संघटना आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केले असून पोलीसांनी 12 आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, पत्रकार यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पत्रकारांनी दुपारी तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेख यांना मारहाण करणार्‍या पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगर शहरातील पत्रकारा संघटनांनी केली आहे. पोलीसांनी आंदोलनाचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.
नगर तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी स्वयंम स्फूर्तीने आंदोलन केले आहेत. यात रस्तारोको, मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन यांचा समावेश आहे. निंबळक येथे बाळासाहेब कोतकर, राजेंद्र कोतकर, भाऊसाहेब जर्हाड, मच्छिंंद्र म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळ्याचे दहन केले. तर चास येथे संदेश कार्ले, सभापती रामदास भोर, दिपक कार्ले, पोपट गांगुडे यांनी रास्तारोको आंदोलन केले.

LEAVE A REPLY

*