चित्रकला स्पर्धेमुळे नगरमध्ये अभिजातता; अ. भा. व्यक्तिचित्रण स्पर्धेचा समारोप

0

फिरोदिया मेमोरिअल फौंडेशन व कलाजगत न्यासचा उपक्रम, अ. भा. व्यक्तिचित्रण स्पर्धेचा समारोप

अहमदनगर(प्रतिनिधी)– कलावंतामध्ये अभिजातता असते याचा प्रत्यय व्यक्तीचित्रण स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा आला. एक चित्रकार दुसर्‍या चित्रकाराच्या कलाकृतीला मोठे म्हणतो हे त्या कलावंताच्या अभिजाततेचेच मोठे लक्षण आहे असे मला वाटते, अखिल भारतीय स्तरावरील ही स्पर्धा अहमदनगरला होते ही देखील या शहराच्या अभिजाततेचे लक्षण आहे, असे भावोत्कट उद् गार पद्मश्री, तालयोगी पंडीत सुरेश तळवळकर यांनी काढले.

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फौंडेशन व कलाजगत न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसर्‍या अखिल भारतीय व्यक्तिचित्रण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यांच्या पद्मश्री,पंडीत तळवळकरांच्या अध्यक्षतेखाली रविवारी रात्री स्टेशन रस्त्यावरील बडीसाजन ओस्तवाल मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फौंडेशनच्या अध्यक्षा आशा फिरोदिया,उद्योजक नरेंद्र फिरोदिया, परीक्षक ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, दत्तात्रेय पाडेकर, वासुदेव कामत, अक्षय कुमार झा, विजय आचरेकर, मनोज सकळे, या स्पर्धेचे संयोजक व कला जगत न्यासचे संस्थापक अध्यक्ष चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

पंडीत तळवळकर पुढे म्हणाले, संगीत , चित्रकला किंबहुना सर्वच कलांमध्ये एक साधर्म आहे ते म्हणजे शास्त्र, तंत्र, विद्या, व कला ही त्यांची प्रमुख चार अंग आहेत. आभिजातता व संस्कार यांचा उगम कलाच आहे. ज्ञान अनुभूतीने येते व अनुभूती साधने शिवाय येत नाही. अभिजाततेचे पाठबळ हे कलेतच दडलेले आहे यासाठी कलेची साधना ही अभिजाततेची व पर्यायाने परमेशाची साधना आहे. दुदैवाने अभिजातता शिकवली जात नाही.
चित्रकार व व्यासंगी लेखक रवी परांजपे यांना पंडीत तळवळकरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.रूपये एक लाख रोख, सन्मानचिन्ह, व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या सत्काराला चित्रकार परांजपे म्हणाले, माझा बहुतांश काळ हा इलेस्ट्रेशन मध्ये गेला पेन्टींगकडे मी तुलनेनी उशिरा वळलो माझा हा गौरव खर्‍या अर्थाने अभिजात इलेस्ट्रेशन व पेन्टींग या दोन विभागांचा संयुक्त गौरव आहे.

प्रारंभी या स्पर्धेचे प्रास्ताविक उद्योजक नरेंद्र फिरोदियांनी प्रास्ताविक केले, व्यक्तीचित्र ( पोट्रेट ड्रॉईंग ) स्पर्धेचे हे दुसरेच वर्ष आहे मात्र या स्पर्धेला देशभरातुन मिळणारा प्रतिसाद पाहुन आपण थक्क आहोत.या स्पर्धेच्या निमित्ताने गेली दोन दिवस अहमदनगर शहर कला नगरी झाली आहे. माझे शहर कला- क्रीडा नगरी व्हावी हे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फौंडेशनचे उद्दिष्ठ सार्थ होत असल्याचे दिसत आहे असे ते म्हणाले. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात लाईव्ह पोट्रेट ही संकल्पनाच नाहीशी झालीय आम्ही आयोजक या नात्याने ही संकल्पना पुन्हा रुजवण्यासाठी प्रत्येक राज्यातील कला विश्वात विशेष प्रयत्न करण्याच मानस त्यांनी व्यक्त केला.

या बरोबरच बॉम्बे आर्ट सोसायटीच्या 128 वर्षाचा इतिहास शब्दबध्द करण्याचा संकल्पाच्या मदतीसाठी 3 लाख रुपयांचा धनादेश देण्याची घोषणा त्यांनी केली. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फौंडेशनच्या अध्यक्षा आशाताई फिरोदिया यांच्या हस्ते हा धनादेश बॉम्बे आर्ट सोसायटीचे पदाधिकारी वासुदेव कामत व सुहास बहुळकर यांनी स्विकारला.
या प्रसंगी या स्पर्धेचे परीक्षक सुहास बहुळकर, वासुदेव कामत, अक्षयकुमार झा ,यांची भाषणे झाली या स्पर्धेचे परिक्षणासाठी चित्रकार रवी परांजपे, दत्तात्रेय पाडेकर,विजय आचरेकर, मनोज सकळे, यांनी अनमोल सहकार्य केले तसेच स्पर्धासंयोजना चित्रकार शुभंकर कांबळे, सौ.मोना कांबळे, रचना कला महाविद्यालयाचे संचालक प्रशांत शेकटकर, सौ.वर्षा शेकटकर यांच्या नेतृत्वात रचना कला महाविद्यालयाचे विद्यार्थी अहोरात्र झटत होते. तसेच चित्रकार गणेश जिंदम, किरण गवते, अशोक क्यातम, प्रशांत आडेप, महेंद्र येनगुल, सचिन सांगळे, तुषार चोरडीया, भुतारे मंडप डेकोरेटरचे गणेश भुतारे आदींचे अनमोल सहकार्य लाभले.

मानपत्राचे वाचन विणा दिघे यांनी केले, मानपत्राचे शब्दांकन संजय जोशी यांनी केले होते. आभार प्रदर्शन कला जगत न्यासचे संस्थापक अध्यक्ष चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केले. स्पर्धेचा निकाल असाः विद्यार्थी गटः प्रथम कुमार मिसाळ , द्वितियः सुरेश जांगिड, तृतीयः अनिरुध्द सुर्यवंशी उत्तेजनार्थः अजय सांगळे, गणेश आठवले, रोशन अन्वईकर.
व्यावसायिक गटः प्रथम कुडवैय्या हिरेमठ , द्वितियः रोहन कुंभार, तृतीयः दिलिप दुधाणे उत्तेजनार्थः विशाल वडई, अमोल टकले, अक्षय पै.

LEAVE A REPLY

*