Friday, April 26, 2024
Homeनगरमंत्र्यांच्या बैठकीला परवानगी, मग झेडपीच्या का नाही ?

मंत्र्यांच्या बैठकीला परवानगी, मग झेडपीच्या का नाही ?

जि. प. सदस्यांत नाराजी : शिक्षण समितीची सभा तांत्रिक कारणामुळे तहकूब

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात करोना संसर्गामुळे लॉकडाऊन आणि कलम 144 लागू आहे. मात्र, अशा परिस्थितीत राज्य सरकारमधील मंत्र्यांची बैठक होवून त्या ठिकाणी 40 ते 50 व्यक्ती हजर राहतात. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या मासिक सभेला दहा सदस्य आणि अन्य अधिकार्‍यांना हजर राहण्याची परवानगी नाही. हा कोणता न्याय आहे, असे म्हणत जि. प. सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, गुरूवारी शिक्षण समितीची मासिक सभा तांत्रिक कारणामुळे तहकूब करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली.

- Advertisement -

जिल्ह्यात करोनाचा कहर सुरू आहे. अशीच परिस्थिती राज्यात आणि देशात आहे. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नाही, अशी परिस्थिती आहे. यावर चर्चा करण्यासोबत जिल्ह्यातील शैक्षणिक धोरण काय असावे, ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करता येईल यावर गुरूवारच्या शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. मात्र, या सभेला सदस्यांना हजर राहण्यास परवानगी नसल्याने ही सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यावेळी तांत्रिक बिघाड झाल्याने सदस्यांचा संपर्क होत नसल्याने अखेर ही सभा तहकूब करण्यात आली.

दरम्यान, याच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कृषी मंत्री दादा भूसे यांची कृषी नियोजनाची बैठक होती. या बैठकीला 40 ते 50 अधिकारी आणि व्यक्तींसोबत मंत्री उपस्थित होते. या ठिकाणी सामाजिक अंतर, कलम 144 आणि करोना संसर्गाचा प्रादर्भाव नाही का, असा सवाल जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केला आहे.

जिल्हा परिषदेची काल शिक्षण समितीची मासिक बैठक होती. ही बैठक तांत्रिक कारणामुळे रद्द झाली. बैठकीत करोना संसर्गानंतर सुरू होणार्‍या शैक्षणिक वर्षाबाबत महत्वपूर्ण चर्चा होणार होती. मात्र, जमाव बंदी आदेश असल्याने सदस्य सभेला समक्ष उपस्थित राहू शकले नाही. यापुढे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोशल आंतर पाळून सभा घेण्यास हरकत नाही.
– राजेश परजणे, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य.

- Advertisment -

ताज्या बातम्या