गांधींच्या वाटेत काटे!

0
आरोपांमुळे दिलीप गांधी लोकसभेच्या तोंडावर अडचणीत
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेच्या कारभारावरून खासदार दिलीप गांधी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि ते देखील ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांनी केलेल्या आरोपामुळे यावर पुन्हा एकदा वादळ उठणार हे निश्चित आहे.
खासदार दिलीप गांधी आणि सुवालाल गुंदेचा यांच्यातील मनोमिलन अलिकडील काही वर्षांचे आहे. त्यापूर्वी खासदार गांधी गुंदेचा यांच्या विरोधात अर्बन बँकेची निवडणूक लढलेले आहेत. ते खासदार झाल्यानंतर गांधी-गुंदेचा ही बँकिंग क्षेत्रातील सहमतीची एक्सप्रेस सुरू झाली. गेले काही वर्ष सर्व काही ठिकठाक चालले असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र ते किती कुचकामी होते, हे काल गुंदेचा यांचा अनावर झालेल्या संतापातून समोर आले आहे.
काल अर्बन बँकेच्या काही आजी-माजी संचालकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर बँकिंग क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. देशातील गेल्या काही वर्षांतील चित्र पाहता अगोदरच बँकिंग कारभारावरून लोकांचा विश्वास उडत चालला आहे. त्यापेक्षा म्युच्युअल फंड बरा, असे अनेकांचे मत बनत चालले आहे. विजय मल्या, निरव मोदी यांच्या प्रतापामुळे तर एकूण बँकिंग कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरी भागात सर्वसामान्य आणि व्यापारी यांची बँक म्हणून सहकारी बँकांकडे पाहिले जाते. मध्यंतरी शहरातील एका सहकारी बँकेतील कर्जप्रकरणाने खातेदार अस्वस्थ झाले होते. त्यातून खातेदार सावरत नाही, तोच आता अर्बन बँकेच्या एकूण कारभाराबाबत त्यांच्याच संचालकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
वादग्रस्त व्यक्तीला प्रत्येकी बारा कोटी रूपयांचे तीन कर्ज प्रकरण मंजूर करण्याचा घाट घालणे, पन्नास कोटी रूपयांचे नियमबाह्य कर्ज वाटप करणे, कर्जवाटप करताना मनमानी करणे, 163 कोटींच्या घरात एनपीए जाणे, अ वर्ग लोप पावणे, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करणे असे अऩेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप निश्चितच बँकेचे चेअरमन असलेले खासदार दिलीप गांधी यांच्यावर आहेत. शिवाय गांधी समर्थक संचालकांची मनमानीबाबतही खासगीत चर्चा केली जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीत अर्बन बँकेचेच झेंगट खासदार गांधी यांच्या मागे लागले होते. त्याची चौकशी निल करण्यासाठी राज्यातील व केंद्रातील सत्तेचा वापर करण्याचा आल्याचा आरोपही होत आहे.

या वेळी झालेले आरोप गांभिर्याने घेण्याचे कारण म्हणजे अनेक वर्षे एकहाती अर्बन बँकेत सत्तेवर राहून ती नावारूपाला आणणारे गुंदेचा यांनी हे आरोप केले आहेत. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून जिल्ह्यात ज्यांना ओळखले जाते, त्यातील गुंदेचा एक आहेत. शिवाय वय वाढत चालल्यामुळे त्यांना आता सत्तेची फार लालसा आहे आणि त्या पोटी हे आरोप केले, असेही म्हणता येणार नाही. त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊ नये, म्हणून अगोदर जोरदार प्रयत्नही करण्यात आले.

गांधींच्या उत्तराकडे लक्ष
अर्बन बॅँक शहरातील महत्त्वाची आर्थिक संस्था आहे. या संस्थेला डबघाईला आणण्याचाच हा प्रकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केल्यामुळेच गांधी यांनी लोकसभा आणि त्यापूर्वी महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना याची उत्तरे देणे आवश्यक झाले आहे.

LEAVE A REPLY

*