देशपांडे रुग्णालयाची अवकळा हटली

0

सव्वादोन कोटी देण्यास शासन राजी; मुकुंदनगर, केडगाव, नागापूर उपकेंद्रांना 10 लाख

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉक्टर, नर्स नाहीत असे म्हणत महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची चिरफाड करण्याची संधी आता कोणाला मिळणार नाही. राज्य शासनाने रुग्णालय दुरूस्ती करीता सव्वादोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 82 पदांना मानधनासहीत मंजुरी दिली आहे. महापौर सुरेखा कदम यांनी ही माहिती दिली.
गोरगरीब रुग्णांसाठी बाळासाहेब देशपांडे रुग्णालय हा आधार आहे. त्यामुळे येथे येणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने रुग्णांना सेवा देण्यास अनेक अडचणी येत होत्या. आकृतीबंधामुळे नव्याने कर्मचारी भरती करणे महापालिकेला शक्य नव्हते. त्यामुळे देशपांडे रुग्णालयात कर्मचार्‍यांच्या पदांना मंजुरी मिळावी अशी मागणी महापौर सुरेखा कदम यांनी शासनाकडे केली होती. त्याची दखल घेत शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 2 कोटी 10 लाख 59 हजार रुपये मंजूर केले आहे. देशपांडे रुग्णालयातील 82 पदांना मानधनासहीत मंजुरीही दिली आहे. केडगाव, मुकुंदनगर, नागापूर व बोल्हेगाव येथील आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 15 लाख तसेच दाणे डबरा, झेंडीगटसह जुन्या आरोग्य केंद्र इमारतीच्या दुरूस्तीसाठी प्रत्येकी 10 लाख असे 50 लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. कै. बाळासाहेब देशपांडे दवाखाना व सुतिकागृह दुरूस्तीसाठी 25 लाख रुपये तसेच 16 बाह्य रुग्ण शिबिराच्या आयोजनाचा खर्च करण्यालाही शासनाने मंजुरी दिली आहे. याशिवाय आशा सेविका प्रशिक्षणासाठी 6 लाख रुपये, झोपडपट्टी भागात महिला आरोग्य समिती स्थापन करण्यालाही शासनाने मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचारी संख्या वाढणार असल्याने दवाखान्याचा प्रश्‍न कायमचा निकाली निघणार आहे. रुग्णांना चांगली सुविधा मिळणार असून त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन महापौर कदम यांनी केलेे आहे. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा केला.

LEAVE A REPLY

*