काँग्रेसचं पाऊल पुढं…

0
उमेदवारी अर्जाचे वाटप सुरू 35 इच्छुक लाईनीत
अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीच्या मैदानात कासवगतीने चाल खेळणार्‍या काँग्रेसने एकदमच वेग घेत एक पाऊल पुढे टाकले. उमेदवारी अर्जाचे वाटप सुरू करत काँग्रेसने महापालिका निवडणूक प्रक्रियेत इतरांपेक्षा आघाडी घेतली आहे. पहिल्याच दिवशी 35 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती प्रभारी शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी दिली. भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने नगरचे मैदान ढवळून काढले असताना काँग्रेस मात्र गारद असल्याचे चित्र होते.

काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, सत्यजित तांबे आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी गत आठवड्यात शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर कालपासून (गुरूवार) काँग्रेसने उमेदवारी अर्जाचे वाटप सुरू केले. पक्षाने दोन निरीक्षक नियुक्त केले असून ते आज (शुक्रवारी) नगरात येत आहेत. पक्षाची नगरमधील स्थिती अन् इतर राजकीय घडामोडीची माहिती घेतल्यानंतर ते प्रदेशला अहवाल देणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची किंवा कसं याचा निर्णय घेतला जाईल. उमेदवारी अर्ज वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे. पाच दिवस ही प्रक्रिया सुरू राहिलं. त्यानंतर पक्षाकडे आलेल्या अर्जाची छाननी केली जाईल. पक्षाचे नेते विखे पाटील आणि थोरात,तांबे एकत्रित बसून निर्णय घेतील अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांचे आणि कोतकर-जगताप कुटुंबाचे कधीच सूत नव्हते. त्यामुळे काँग्रेसमध्ये चव्हाण विरुद्ध कोतकर समर्थक असा वाद कायम राहिलेला आहे. शहर जिल्हाध्यक्ष असल्यामुळे संघटनात्मक अधिकार चव्हाण यांच्याकडे आहेत. मात्र अद्याप केडगाव परिसरातील कोतकर समर्थकांना एकत्र आणण्याची जबाबदारी ते पेलू शकलेले नाहीत. गेल्या चार वर्षांत शहरात काँग्रेसची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आता पूर्णतः विखे पाटील, थोरात आणि प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित पाटील यांच्यावर पूर्णतः भिस्त आहे.

विखे-थोरातांच्या चमत्काराची आस
काँग्रेसची सध्याची शहरातील अवस्था विखुरलेली आहे. गटबाजीने या पक्षाला शहरात पोखरले आहे. केडगाव परिसरात या पक्षाचे नाणे खणखणीत वाजत असे. मात्र कोतकर कारागृहात असल्याने केडगाव काँग्रेससाठी सुनेसुने झाले आहे. आम केडगावकर दुरावल्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. हे ओळखूनच राष्ट्रवादीनेही काँग्रेसबाबत हात आखडता घेतला आहे. आता विखे-थोरात-तांबे यांनी करामत केली तरच काँग्रेसचा वारू जोरात वाटचाल करेल असे चित्र आहे.

अर्जात गुन्हेगारीचाही कॉलम
काँग्रेस उमेदवारी अर्जात गुन्हेगारी, पक्षाचे सभासदत्व, नाव, पत्ता, कोणत्या वार्डातून उमेदवारी करण्यास इच्छुक आहात? असे मुद्दे आहेत. हे मुद्दे पाहता काँग्रेसने गुन्हेगारीची माहितीही संकलीत करण्यास सुरूवात केल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*