Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

कलेक्टरांचे भाजपपुढं लोटांगण

Share

मनपात मनमानी-शिवसेना, राष्ट्रवादीसोबत दुजाभाव

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेचा कारभार हाती आल्यानंतर रस्ते, नदी साफसफाईतून कर्तव्यदक्षतेचा आव आणणारे कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी भाजपसमोर सपशेल लोटांगण घातलंय. कलेक्टर हे भाजपला फॉर असल्याची चर्चा झाकरीत होतीच, आज (शुक्रवारी) महापालिका मालकीच्या रक्तपेढीतील कार्यक्रमामुळे ती ‘ओपन’ झाली. राष्ट्रवादीचे आमदार आणि सत्ताधारी शिवसेनेच्या महापौरांना अंधारात ठेवून कलेक्टरांनी भाजपचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे व खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करून भाजपची तळी उचलली.

महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात रक्त विघटन प्रयोगशाळा व्हावी, यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात प्रस्ताव तयार झाला. त्यांनी डीपीसी (जिल्हा नियोजन समिती)कडे पाठपुरावा केला. त्यामुळंच प्रयोगशाळेसाठी 95 लाख रुपयांचा निधी मिळाला. जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार असून महापालिकेत शिवसेनेच्या सुरेखा कदम या महापौर आहेत. कलेक्टर तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी प्रयोगशाळा उदघाटनाचा कार्यक्रम महापौरांना विश्‍वासात न घेताच परस्पर निश्‍चित केला. आमदार संग्राम जगताप यांच्याशीही कलेक्टरांनी ब्रही काढला नाही. उद्घाटन कार्यक्रम निश्‍चित झाल्यानंतरच महापौरांना समजलं. पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थित आज (दि.14) उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला. कलेक्टरांच्या या मनमानीचा निषेध म्हणून आमदार संग्राम जगताप यांच्यासह महापौर सुरेखा कदम आणि महापालिकेतील पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमाकडेच पाठ फिरविली.

कलेक्टरांकडे महापालिका आयुक्ताचा पद्भार गेल्यापासून ते सत्ताधारी शिवसेनेला पाण्यात पाहत आहेत. महापालिकेतील लोकप्रतिनिधीला कोंडीत पकडत त्यांचा ‘कार्यक्रम’ कलेक्टरांनी सुरू केला आहे. अनेकदा ओरड झाली, पण कलेक्टर त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. तेव्हाच ते भाजपधार्जीणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. नगर शहर विकासाचं कोणतंच ठोस धोरण आयुक्त या नात्याने कलेक्टरांनी घेतललेे नाही. महापालिकेच्या तिजोरीत जनतेच्या करातून कोट्यवधी रुपये जमा झाले. पण कलेक्टरांनी शहर विकासासाठी त्यातून एक छदामही वापरला नाही, असा आरोप नगरसेवकांनी उघडपणे केला. तरीही त्यांना घाम फुटला नाही. रस्त्यांची वाट लागलीय. पाणी वेळेवर येत नाही. याचे कलेक्टरांना देणेघेणे नाही. यावरून ते भाजपधार्जीणे असल्याची जाहीर नसली तरी झाकरीत चर्चा नगरात रंगली होती, आजच्या कार्यक्रमातून कलेक्टरांनी भाजपापुढं लोटांगण घातल्याचे सिद्ध झाले. परिणामी शिवसेना व राष्ट्रवादीसोबत होत असलेल्या दुजाभावावर शिक्कामोर्तब झाले.

निधीसाठी पाठपुरावा मीच केला. पालकमंत्री शिंदे व तत्कालीन कलेक्टर कवडे यांनी हा निधी दिला. कार्यक्रमासंदर्भात मला कुठलीही माहिती नाही. त्यासंदर्भात कुणी कळविलेदेखील नाही.
– संग्राम जगताप, आमदार

कलेक्टरांनी परस्पर उद्घाटनाचा कार्यक्रम ठरविला. तो ठरविताना विश्‍वासात घेतले नाही. शहर विकासाच्या दृष्टीने हे घातक आहे. यापूर्वी त्याचे उद्घाटन झाले असताना श्रेय वादासाठी दुसर्‍यांचा उद्घाटनाचा घाट घातला गेला.
– सुरेखा कदम, महापौर

विकासाच्या चांगल्या कामात राजकारण करणं अयोग्य आहे. या राजकारणापायी शहरात वेगळाच पायंडा पडेल. महापौरांचा पक्ष कोणता हा भाग अलहिदा, पण त्यांचा मान त्यांना मिळालाच पाहिजे
– गणेश भोसले, माजी सभापती

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!