बिल्डर झाला बॉडीबिल्डर!

0
जीम है जहॉ, तंदुरूस्ती है वहा..
अहमदनगर (प्रतिनिधी) – दीड वर्ष कोमात.. डॉक्टरांनीही गॅरंटी देण्यास नकार दिला. पण ‘त्यांची आतून’ जगण्याची जिद्द. जीवनाची विझू पाहणारी ज्योत पुन्हा तेवली नव्हे प्रकाशमान झाली. आता तर अख्ख्या बॉडीवर कब्जा मिळवत बिल्डर अशोकशेठ बबनराव खोकराळे बॉडीबिल्डर झाले. आरोग्याचे पुजारी असलेले हे बिल्डर मित्रकंपनीलाही आपल्या मागोमाग आणत आहेत. 

अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव हे मुळचे नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबाचे. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने सुमारे 35 वर्षापूर्वी बबनराव हे नगरला आले. सुतारकी अन् लेबरकाम सुरू करत त्यांनी गुजरान सुरू केली. मुलगा अशोकशेठचा जन्म नुकताच झाला होता. त्यांचे पहिली ते कॉलेजचे शिक्षण नगरातच झाले. वडिलांचे काबाडकष्ट पाहून मग शिक्षण करता करताच अशोकशेठ गवंडी काम करू लागले.

वृत्तपत्र टाकणावळीचे कामही करू लागले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास त्याचवेळी त्यांच्या मनात पक्का झाला. पुढे एमआयडीसीत लेबर काम, गवंडी, पेपर टाकणे अशी सगळी कामे सुरू झाली. डोके-कांडेकर यांची ‘कृष्णा कन्स्ट्रक्शन फर्म’ अखेरच्या घटका मोजत होती. अशोकशेठ यांना बांधकाम क्षेत्राचे नॉलेज असल्याची माहिती समजल्यानंतर बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या या फर्मबद्दल अशोकशेठ यांना ‘सांगावा’ आला. शेठने लगेच ‘एस’ म्हणत कामाला सुरूवात केली. 2004 मध्ये अशोकशेठ बिल्डर लाईनमध्ये आले. बघता-बघता ही फर्म पुन्हा नावारुपाला आली. अशोकशेठची मेहनत त्यामागे होती.
2011मध्ये पोटाच्या विकाराने अशोकशेठ आजारी पडले. पुणे-मुंबईपर्यंत धावाधाव केली. पण अपयश दिसू लागले. दीड वर्षे अशोकशेठ कोमात होते. चिचोंडी पाटीलचे डॉ. राहुल पवार आणि पहिलवान शिवाजी चव्हाण (आता नगरसेविका मिस्टर) यांनी खोकराळे कुटुंबाला धीर दिला. त्यांच्या ‘तन-मन-धन’ मदतीने खोकराळे कुटुंबाची उमेद वाढली. उपचार करणार्‍या डॉक्टरांनी ‘नो गॅरंटी’चा निरोप दिला. अशोकशेठ यांना मात्र आतून जगण्याची जिद्द होती. अखेर अशोकशेठ शुध्दीवर आले अन् मालवू पाहणारी त्यांची जीवनज्योत तेवली. खोकराळे कुटुंबाला आनंदाश्रू आले.

आजारपणानंतर मिळालेले आयुष्य ‘बोनस’ समजून अशोकशेठ कामाला लागले. शरीर तंदुरूस्त असेल तर आजारावर मात करता येत ही धारणा पक्की झाली. दवाखान्यातून सुट्टी होताच अशोकशेठ यांनी चव्हाण यांची ‘संभाजी राजे तालीम’ जॉईन केली. पुढं जीमचा रस्ता धरला. आजमितीला ते रोज दोन तास जीममध्ये घालवितात. न चुकता अर्धा तास योगा, पाच किलोमीटर रनिंग आणि तासभर जीम असा त्यांना दिनक्रम. आता ते इतके ‘फिट’ झाले की असं काही त्यांच्या आयुष्यात घडलं यावर कोणाचाच विश्वास बसत नाही.
…………..
रात्रीचं बसणं बंद
अशोकशेठ यांचा मित्र परिवार आणि गोतवळा मोठा. शीणभाग हलका करण्यासाठी मित्र ‘रात्री बसायचे’. अशोकशेठही मित्रासोबत असायचे. पण ते निर्व्यसनी. मित्रांना आरोग्याविषयी सल्ला देत त्यांच्या डोक्यातलं ‘रात्रीचं बसणं’ अशोकशेठने काढून टाकले. मित्रांनाही ते पटलं. त्यातून मित्रांचे ‘रात्रीचे बसणे बंद झाले अन् सकाळचे उठणे सुरू’ झाले. जवळपास शंभर मित्रांचे परिवर्तन अशोकशेठ यांनी केलयं.

LEAVE A REPLY

*