BLOG : पुन्हा पुलाचे उड्डाण!

0

नगर शहरातील उड्डाणपूल कधी उडणार, याची कल्पना नाही.

मात्र या प्रश्‍नावरून होणारी राजकीय उड्डाणे थांबणार नाहीत, हे देखिल तितकेच खरे! काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

यावेळी या प्रश्‍नात राज्य सरकारमधील मातब्बर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न तांबे यांच्याकडून झाला आहे. प्रश्‍न नवा नाही. पण सुटतही नाही. आता तर सरकार बदलले तरी प्रश्‍न जागच्याजागी! या पुलावर अनेकांनी राजकारणाचे आणि उड्डाणाचे इमले रचले.

भाजपा सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर काही महिन्यातच या पुलाचे उड्डाण होईल, अशी आशा खासदार दिलीप गांधी यांनी जागवली होती. पुढे काय झाले, त्यांनाच माहित! अधूनमधून हा प्रश्‍न डोके वर काढतो. काही दिवस चर्चेत राहतो आणि विरतोही! असे कितीदा होणार, हा नगरकरांचा प्रश्‍न आहे. महापालिका निवडणूक तोंडावर आहे. या निवडणुकीसाठी मुद्दा लागेल. उड्डाणपुलाच्या मु्द्याला महापालिकेच्या अनुषंगाने हात घातला जाणे स्वाभाविक आहे. बहुधा सत्यजित तांबे यांनी त्याची सुरूवात केली आहे. या उड्डाणपुलाच्या चर्चेत दशक संपत आले आहे. त्यामुळे या चर्चेत आता नगरकरही हुरळत नाही. उड्डाणपुल झाल्याने तातडीने नगरकरांच्या जीवनात ‘अच्छे दिन’ येतील, याची शक्यता नाही. तरीही राजकारणात चघळायला, एकमेकांवर कुरघोडी करायला मुद्दा लागतो. त्यात या उड्डाणपुलाचा विषय येतो, हे मान्यच करायला हवे! अलिकडे आमदार संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. लोणीकर डॉ.सुजय विखे अनेकदा नगर शहरात डोकावत आहेत. आगामी महापालिकेचे नेपथ्य तयार होत आहे. यात आपण मागे पडू नये यासाठी काही प्रयत्न जाणीवपूर्वक होतील. तसेही शहर वाढताना दिसत असले तरी त्याचे बकालण संपत नाही. महापालिकेतील बजबजपुरीबद्दल तर चर्चाच नको! या स्थितीत पुढील महापालिकेच्या निवडणुकीतील स्थिती काहीशी बदलेल असे दिसते. त्यामुळे उड्डाणपुलासह अन्य विकासकामांवर चर्चा होणे, आरोप-प्रत्यारोप होणे अपेक्षीतच आहे.

सत्यजित तांबे यांनी तर आता नगर शहरातच आपले राजकीय अस्तीत्व असेल हे जाहीरच केले आहे. उड्डाणपुलाच्या निमित्ताने या पुलाला आडवे येणार्‍यांवर कुरघोडीचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळे पुढील काळात तरूण नेत्यांमध्ये राजकीय घमासान आकार घेत गेले तर त्याचे आश्‍चर्य वाटू नये!

LEAVE A REPLY

*