ब्राह्मणीत सूर्यवंशींच्या पुतळ्याचे दहन

0

उंबरे (वार्ताहर) – शेतकर्‍यांच्या राज्यव्यापी संपाला राहुरी तालुक्यात तिसर्‍या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, मुुख्यमंत्र्याबरोबर शेतकर्‍यांच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीतील निर्णय अमान्य असल्याचे सांगत ब्राह्मणी येथील संतप्त शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून गेलेले जयाजी सूर्यवंशी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. सूर्यवंशी फितूर झाल्याचा आरोप करीत शेतकर्‍यांनी संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत हा संप असाच चालू राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ब्राह्मणी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

 
गेल्या दोन दिवसांपासून शेतकर्‍यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. या संपाला सर्व स्तरांतून चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे शासनाचे धाबे दणाणले असून संपात फूट पाडण्याचे कारस्थान सरकार करीत असल्याचा आरोप येथील शेतकर्‍यांनी केला आहे. शुक्रवारी रात्री मुंबई येथील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकर्‍यांच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात जयाजीराव सूर्यवंशी होते.

 

 

या बैठकीत मागण्या मान्य झाल्या, अन् संप मिटला असे जाहीर करून शेतकर्‍यांची दिशाभूल करण्यात आली. या षडयंत्राचा शेतकर्‍यांनी निषेध केला. सूर्यवंशी यांनी तडजोड केली आहे. ती आम्हाला अमान्य असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. जोपर्यंत संपूर्ण मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. काल शनिवारी उंबरे येथील आठवडे बाजार असूनही शेतकर्‍यांनी भाजीपाला न आणल्याने बाजारात शुकशुकाट आढळून आला.

LEAVE A REPLY

*