Monday, April 29, 2024
Homeनगरनगरात दीड हजार बोगस गाळे पत्रामार्केटची दुकानदारी

नगरात दीड हजार बोगस गाळे पत्रामार्केटची दुकानदारी

अहमदनगर (प्रतिनिधी) – रस्त्याकडेला असलेल्या जागेत पत्र्याचे शेड उभा करून ‘दुकानदारी’ सुरू करण्याचा प्रकार नगरात जोमात सुरू झालाय. पत्रा मार्केटचे पेव उपनगरातही फुटल्याचे महापालिकेने केलेल्या सर्व्हेत समोर आले आहे. केडगावपासून ते एमआयडीसीपर्यंत पत्र्याचे शेेड ठोकून जवळपास दीड हजार गाळ्यांतून ही दुकानदारी सुरू असल्याची धक्कादायक बाब सर्व्हेतून समोर आली आहे.

नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण. मोक्याच्या मार्केटमध्ये जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. उपनगरही झपाट्याने वाढते आहे. नगर मार्केटमधील पार्किंग समस्येमुळे उपनगरात मार्केटला सुगीचे दिवस येवू पाहताहेत. इन्टंट दुकान सुरू करण्याकरीता पत्र्याचा शेड टाकण्याला व्यवसायिकांनी पसंती दिली आहे. पत्र्याचा मोठ्ठा शेड टाकून त्यात एकाच लाईनमध्ये आठ-दहा गाळे बांधत ‘दुकानदारी’ सुरू झाल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

पत्र्याचे हे गाळे सुरू करताना महापालिकेची कोणतीच परवानगी घेतलेली नाही. ना पार्किंगसाठी जागा ना साईड मार्जिन. शिवाय पत्र्याच्या गाळ्यातील जागा ही मर्यादीत असल्याने अनेकांचा ‘माल’ रस्त्यावर आलाय. त्यातून ट्राफिकचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेकडे यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर शहरातील पत्र्याच्या गाळ्यांचा सर्व्हे करण्यात आला. अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पुढाकारातून हा सर्व्हे झाला. त्यात तब्बल दीड हजार गाळे पत्र्याच्या शेड मारून सुरू असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ते गाळे बांधताना कुठलीच परवानगी घेतली नसल्याचेही समोर आले. या गाळेधारकांना नोटीसा पाठविण्याचे काम महापालिकेतून सुरू झाले आहे.

महिनाभरात बांधलेले गाळे काढून घ्या, अन्यथा महापालिका त्यावर हतोडा टाकले असा सज्जड इशारा नोटीसमध्ये दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सावेडी, केडगावात पेव
सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड आणि एकविरा चौक, भिस्तबाग चौकात पत्र्याचे शेड टाकून ‘दुकानदारी’चे पेव फुटले आहे. केडगावातही असाच प्रकार सुरू आहे. पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेले गाळे भाडोत्री देत ‘कमाई’चा उद्योग सुरू असल्याचे दिसून आले. आता महापालिका या गाळ्यांवर हतोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.

पत्र्याचा शेड उभारताना कोणतीही परवानगी घेतलेली नाही. पार्किंग, मार्जिनचे कोणतेच नियम पाळलेले नाहीत, अशा दीड हजार गाळेधारकांना नोटीसा पाठविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गाळे नियमीत करा किंवा काढून घ्या यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर हतोडा टाकण्याची कारवाई सुरू होईल.
– सुरेश इथापे, विभागप्रमुख, अतिक्रमण निर्मुलन.

- Advertisment -

ताज्या बातम्या