भाजपच्या गटबाजीला प्रदेशचा बुस्टर

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्ष कामाला लागले असले, तरी 42 प्लसचा नारा देऊन रणांगणात उतरणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या फुग्यातील ही हवा कितपत टिकेल, याबाबत पक्षातूनच साशंकता व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीपासून प्रचंड गटबाजीत बुडालेल्या भाजपसमोर महापालिका निवडणुकीत अनेक मोठी आव्हाने आहेत. नगर शहर भाजपातील गटबाजी संपुष्टात येऊ नये यासाठी प्रदेशपातळीवरूनच ‘बुस्टर’ दिला जात असल्याचे बोलले जात आहे. 
या आव्हानावर अद्याप वरिष्ठ पातळीवरून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. गटबाजी हे प्रमुख आव्हान असताना, ती संपुष्टात येणे अशक्य आहे. किमान ती शमविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होण्याची अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आहे. प्रदेश पातळीवरून मात्र ती शमविण्याऐवजी त्याला खतपाणी घालण्याचाच प्रकार होत आहे. अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यातील गटबाजी उफाळून आलेली आहे. वरवर शांतता दिसत असली, तरी या दोघांतील वाद शमण्याची शक्यता आता तरी दिसत नाही. शहराच्या कामकाजात आगरकर गटाला जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रकार, त्यांच्या समर्थकांची केलेली अवहेलना या प्रकारामुळे हा गट अस्वस्थ आहे. महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेनेने अगोदरच दिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत युती होण्याची शक्यता धूसर आहे. आले तर बरोबर, नाहीतर स्वतंत्र असा आव भाजप नेते आणत असले, तरी त्यांनाही युती न झाल्यास काय स्थिती होईल, याची जाणीव आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून युती होण्यासाठी प्रयत्न होतील, असे मानणारा पक्षात एक वर्ग आहे.

दोन दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेेब दानवे यांनीही युतीबाबत सावध भूमिका घेतल्याचे जाणवले. पक्षाचे महापालिकेतील गटनेते दत्ता कावरे यांचा शिवसेनेतील प्रवेश भाजपच्या वर्मी लागलेला आहे. कावरे यांना प्रवेश करण्यास भाग पाडण्यात आले. तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली, असा आरोपही होत आहे. पक्षाने गटनेता म्हणून त्यांची नियुक्ती केलेली असतानाही जाणीवपूर्वक युवा नेत्याला गटनेता म्हणून संबोधण्यात येत होते. महापालिका निवडणुकीची उमेदवारी कोणाला द्यायची, हे आमच्याच हातात आहे, अशी चर्चा घडवून कावरे यांना डावलण्यात येणार असल्याची चर्चा घडवून आणण्यात आली. एवढेच नव्हे, तर कावरे यांच्या प्रवेशानंतर अ‍ॅड. आगरकर देखील शिवसेनेत जाणार असल्याच्या वावड्या उठविण्यात आल्या. त्यासाठी सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे आगरकर गट प्रचंड अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत 42 प्लसचा नारा कसा प्रत्यक्षात उतरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीतही 40 प्लसचा नारा दिलेल्या भाजपला कसाबसा दोन अंकी आकडा गाठता आला.

महापालिकेत यापेक्षा वेगळे काही होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न पक्षातूनच उपस्थित केला जात आहे. गेल्या तीन निवडणुकांतील भाजपची स्थिती पाहिली असता त्यांचे सर्वाधिक नगरसेवक 15 निवडून आलेले आहेत. नंतर अकरा आणि विद्यमान महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. 42 प्लसचा नारा देताना या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बाहेरच्या पक्षातील बलदंड पक्षात घेऊन त्यांच्या आधारावर 42 प्लसचा आत्मविश्वास असल्यास तो फालतू असल्याचे सिद्ध होऊ शकते. सध्याची परिस्थिती पाहता शहरातील किमान 30 जागांवर भाजपला सक्षम उमेदवारांची वानवा आहे. एका प्रभागात चार उमेदवार असल्याने इतर उमेदवारांना बरोबर घेत, प्रसंगी ओढत विजयापर्यंत नेण्याची क्षमता असलेला उमेदवारही मिळणे दुरापास्त झाले आहे. केडगाव, सावेडी उपनगरातील काही प्रभाग, सारसनगर, बुरूडगाव रस्ता परिसर आदी भागांत उमेदवारांची चणचण आहे. शिवाय मुकुंदनगर, झेंडीगेट या मुस्लिम बहुल भागात चिन्हासाठी तरी माणूस शोधावा लागेल, असे बोलले जाते. सांगली, जळगावमध्ये विजय झाला, म्हणून नगरमध्येही होणार, या समजावर महापालिका ताब्यात आणणे केवळ अशक्य आहे.

LEAVE A REPLY

*