कोतकरांमागे साडेसातीचा फेरा

0
सरकारला नोटीस
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावच्या भानुदास कोतकर फॅमिलीमागे लागलेली साडेसाती अजूनही पिच्छा सोडायला तयार नाही. केडगावच्या डबल मर्डरच्या गुन्ह्यात भानुदास कोतकरला कसाबसा जामीन मिळाला. मात्र त्यालाही फिर्यादीने आक्षेप घेत हायकोर्टात अपील केलं आहे. हायकोर्टाने सरकारी पक्षाला नोटीस काढत कागदपत्रं मागविली आहेत. 

अशोक लांडे खून प्रकरणात भानुदास कोतकर अन् त्याच्या मुलांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. शिक्षा भोगत असतानाच केडगावात 7 एप्रिल 2018 रोजी डबल मर्डर झाला. केडगाव पोटनिवडणुकीच्या निकालादिवशीच शिवसेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. संग्राम कोतकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. या गुन्ह्यात पोलिसांनी भानुदास कोतकरला 14 मे रोजी अटक केली. सुमारे तीन महिने जेलमध्ये काढल्यानंतर 14 ऑगस्ट रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

या जामिनाला संग्राम कोतकर यांनी आक्षेप घेत औरंगाबाद हायकोर्टात आव्हान दिलं. चार्जशीटमध्ये असलेले पुरावे योग्य पध्दतीने ग्राह्य धरले नाहीत. तसंच सत्र न्यायालयाने चुकीच्या पध्दतीने जामीन मंजूर केल्याचे नमूद करत भानुदास कोतकरचा जामीन रद्द करण्याची मागणी संग्राम कोतकर यांनी अ‍ॅड एन.बी. नरवडे यांच्यामार्फतीने केली आहे. कोर्टासमोर या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने सरकारला नोटीस बजावली आहे. शिवाय कोर्टाने या गुन्ह्याची कागदपत्र सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. कोर्टाच्या या आदेशामुळं भानुदास कोतकर अन् त्याच्या फॅमिलीमागे सुरू असलेला साडेसातीचा फेरा काही संपेना.. अशी चर्चा नगरात सुरू आहे.

LEAVE A REPLY

*