लोकपाल आंदोलन तीव्र करणार; राळेगणसिद्धी येथे कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय शिबिर

0

अहमदनगर : तीन वर्षानंतरही लोकपाल कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस निर्णय होत नसल्याने पुन्हा एकदा जन आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार शनिवारी राळेगणसिद्धी येथे झालेल्या राष्ट्रीय शिबिरात देशभरातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

1 जानेवारी 2014 रोजी लोकपाल कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर मोदी सरकार सत्तेवर आले. तेव्हापासून लोकपाल कायद्याच्या अंमलवजावणीसाठी अण्णा हजारे यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतू केंद्र सरकार कोणताही प्रतिसाद देत नसल्याने गत 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी हजारे यांनी अचानक दिल्लीतील राजघाटावर एक दिवसाचा आत्मक्लेश सत्याग्रह केला. त्याचवेळी त्यांनी आगामी काळात मोठे आंदोलन छेडण्याचे सुतोवाच केले होते. त्याच्या तयारीचा एक भाग म्हणून आज राळेगणसद्धी येथे कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय शिबिरास सुरुवात झाली.

शिबिराच्या पहिल्या दिवशी देशभरातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. आगामी आंदोलनाबाबत रणनीतीवर चर्चा करण्यात आली. आंदोलनाच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांनी विविध सूचना केल्या. यावेळी मार्दर्शन करताना अण्णा म्हणाले, भ्रष्टाचाराच्या बाबतीत देशात कोणताही बदल झालेला नाही. भ्रष्टाचाराची झळ सामान्य माणसाला बसते. भ्रष्टाचा मुक्त भारत हे आपले अंतिम उद्दिष्ट आहे. ते पूर्ण होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. तीन वर्षे केंद्र सरकारला अनेक पत्र लिहिली. जाणीव करून दिली. परंतू लोकपाल, जनतेची सनद यासह भ्रष्टाचार रोखणाऱ्या विविध कायद्याची अंमलबजावणी करण्याची सध्याच्या सरकारची आजिबात इच्छा नाही हे स्पष्ट झाले आहे. म्हणून पुन्हा एकदा आंदोलनाची गरज निर्माण झाल्याने सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना सर्वोदयचे प्रमुख अमरनाथ भाई म्हणाले, जेव्हा सज्जन माणसे मौन धारण करतात, तेव्हा सर्वत्र भ्रष्टाचार बोकळल्याशिवाय राहत नाही. अण्णांनी ते मौन सोडण्याची वेळ आली आहे. विविध सरकारांनी गेल्या सत्तर वर्षात जनतेला झोपवले आहे. त्या निद्रिस्त जनतेला जागविण्याचे काम अण्णांनाच करावे लागेल. जयप्रकाश नारायण यांच्यानंतर देशातील जनतेला आता केवळ अण्णांकडून अपेक्षा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जोपर्यंत जागरुक, संघटित और निर्भय लोक रस्त्यावर उतरणार नाहीत तोपर्यंत देशात खरे परिवर्तन येणार नाही. म्हणून आता निर्णायक आंदोलनाची तयारी करावी.

यावेळी राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, उडिसा, कर्नाटक, तेलंगना, मध्य प्रदेश, हरियाना, आंध्र प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र इत्यादी राज्यांमधील प्रमुख कार्यकर्ते शिबिरासाठी उपस्थित आहेत. रविवारी या दोन दिवसीय शिबिराचा समारोप होणार आहे. यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे उपाध्यक्ष प्रा. बालाजी कोंपलवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कर्नल दिनेश नैन, विनायक पाटील, मनिंद्र जैन, कल्की, करनवीर, सुनिल लाल इत्यादी कार्यकर्त्यांनी चर्चेत भाग घेतला. अशोक सब्बन यांनी प्रास्ताविक केले तर अल्लाउद्दीन शेख यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*