संक्रांतीपासून वकिलांचा लढा

0

चेेंबरसाठी आंदोलन, ‘आरोग्य’च्या जागेवर दावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा न्यायालयाजवळील आरोग्य विभागाच्या जागेवर वकिलांचे चेंबर्स होण्यासाठी मंगळवारी (दि.15) मकर संक्रांतीच्या दिवशी लढ्याचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.भास्करराव आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वकिलांना तीळगुळ वाटून चेंबर्ससाठी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

नवीन जिल्हा न्यायालय झाल्यापासून वकिलांना बसण्यासाठी चेंबर्स नाही. नवीन न्यायालयात वकिलांना बाररुम उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, सदरील जागा अत्यंत कमी पडत आहे. बाररुम मध्ये मोठ्या संख्येने वकिल मंडळी कोंबले गेल्याने वकिलांचे खुराडे निर्माण झाले आहेत. खटला चालवत असताना पक्षकाराकडून माहिती घेताना वकिलांची गैरसोय होत आहे. तसेच इतर कामासाठी देखील मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.

न्यायदान प्रक्रियेत वकिल महत्त्वाची भुमिका बजावत असताना त्यांना चेंबर्सची नितांत आवश्यकता आहे. मागे देखील वकिलांच्या चेंबर्ससाठी लढा पुकारण्यात आला होता. मात्र न्यायालय लष्करी हद्दीत असल्याने स्थलांतर होण्याच्या अफवेने अनेक वकिल मंडळी या लढ्यापासून लांब राहिले. सर्व वकिलांना तिळगुळ देऊन चेंबर्सच्या लढ्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

जिल्हा न्यायालयाजवळ आरोग्य विभागाची (सिव्हिल हॉस्पिटल) मोठ्या प्रमाणात जागा पडून आहे. राज्य सरकारने संयुक्त भागिदारी धोरण स्विकारले असून, या जागेवर वकिल आपल्या खर्चाने चेंबर्ससाठी इमारत उभारणार आहे. त्यापैकी 35 टक्के बांधलेली जागा संयुक्त भागीदारी धोरणनुसार सरकारला दिली जाणार आहे. वकिलांनी संघटित झाल्याशिवाय या आंदोलनाला यश येणार नसून, संक्रांत निमित्त या लढ्याला चालना मिळणार असल्याची भावना अ‍ॅड.गवळी यांनी व्यक्त केली आहे. यावेळी वकिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन शहर वकिल संअघाचे अध्यक्ष अ‍ॅड.शेखर दरंदले, अ‍ॅड.गजेंद्र पिसाळ, अ‍ॅड.प्रसाद गांगर्डे, अ‍ॅड.राजेश कावरे, अ‍ॅड.सुनिल आठरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*