‘अंत्योदय’मध्ये 246 गावांची निवड

0

2019 पर्यंत दारिद्य्रमुक्त ग्रामपंचायती करण्याचा संकल्प

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या संकल्पनेतून साकारणार्‍या मिशन अंत्योदय योजनेसाठी जिल्ह्यातून 246 गावांची निवड होणार आहे. निवड होणार्‍या गावात सरकारच्या विविध योजना आणि कार्यक्रमाव्दारे संबंधीत गाव 2019 पर्यंत दारिद्य्र मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत अंत्योदय योजनेच्या गावांची निवड करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने 2017-18 च्या अर्थसंकल्पात मिशन अंत्योदय राबविण्याची घोषणा केलेली आहे. या अभियानांतर्गत 2019 पर्यंत ग्रामपंचायती दारिद्य्र मुक्त करण्यात येणार आहेत. 1 कोटी ग्रामीण कुटुंबे दारिद्य्ररेषेच्यावर आणण्यात येणार असून यासाठी राज्यातील 5 हजार 227 ग्रामपंचातींची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 246 ग्रामपंचायतींचा यात समावेश राहणार आहे.
निवड करण्यात येणारी ग्रामपंचायत ही हागणदारीमुक्त असावी, दीनदयाल अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता बचत गट कार्यरत असलेली ग्रामपंचायत, जलसंधारण अभियान सुरू असलेली ग्रामपंचायत, सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवडलेली ग्रामपंचायत, रुरर्बन क्लस्टर योजनेत निवड झालेली ग्रामपंचायत, गुन्हेगारी मुक्त (तंटामुक्त) असलेली ग्रामपंचायत, राज्य शासनाकडून विशेष लाभासाठी निवडलेली ग्रामपंचायत आणि पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत यांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या 10 ग्रामपंचायत समूहाचा क्लस्टर तयार करण्यात येणार असून या माध्यमातून दारिद्य्र निर्मूलन, ग्रामसभेचा सक्रिय सहभाग, गावातील स्वयंसहाय्यता बचत गट आणि प्रत्येक कुटुंबासाठी सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करणे, ग्रामपंचायतींचा विकास आराखडा तयार करणे, मानव संसाधन व सशक्तीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना केंद्र सरकारने राज्यातील सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी घोषित केलेले राज्य नोडल अधिकारी या अभियानासाठी नोडल अधिकारी राहणार आहेत.

तालुकानिहाय गावे
अकोले 27, कोपरगाव 14, संगमनेर 27, राहाता 9, श्रीरामपुर 10, राहुरी 15, नेवासा 21, शेवगाव 18, पाथर्डी 20, जामखेड 11, कर्जत 17, श्रीगोंदा 16, पारनेर 21 आणि नगर 20 या गावांचा समावेश राहणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनांप्रमाणे मिशन अंत्योदय योजनेसाठी जिल्ह्यातून 246 गावांची निवड करण्यात येणार आहे. सरकारच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. निवड करण्यात येणार्‍या गावांत 2019 पर्यंत दारिद्य्र निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
– प्रशांत शिर्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग.

LEAVE A REPLY

*