कृषिला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा

0

शासनाचा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील कृषी विद्यापीठ अंतर्गत शिकविण्यात येणार्‍या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
कृषी शिक्षणाबाबत नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने मार्गदर्शक सूचना, अटी प्रसिद्ध केल्या आहेत. या सर्व सूचना देशातील सर्व कृषी शिक्षण संस्थांसाठी लागू ठरतात. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नियामक मंडळाच्या जून महिन्यात झालेल्या बैठकीत कृषी अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केले आहे.
शासनाने यापूर्वी कृषी अभ्यासक्रमात बदल करून जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांचा समावेश केला आहे. तसेच अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला विद्यार्थ्याला ऐच्छिक विषय म्हणून एखादा विषय निवडण्याची संधी मिळाल्याने तो अधिक कुशल होणार आहे.
कृषिला व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून दर्जा देण्याचा मागचा उद्देश हा विद्यार्थ्यांना शेतीपूरक व्यवसाय करता यावेत असा आहे. विद्यार्थ्यांना मिळणार्‍या रोजगाराच्या संधीत यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्याने मिळविलेली पदवी ही तज्ञ व तंत्र कुशल असल्याने याचा फायदा नोकरी मिळविण्यासाठी होणार आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात कृषी शिक्षण क्षेत्रातील नऊ अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात कृषी, फलोत्पादन, कृषी अभियांत्रिकी, वनशास्त्र, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, रेशीम किडे शास्त्र, गृह विज्ञान-सामाजिक विज्ञान, अन्न व पोषण आहार शास्त्र यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*