Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये वाढतेय ‘कृषी पर्यटन’

Share

नैसर्गिक संसाधनांमुळे पर्यटनाचे अनेक पर्याय; फूड प्रोसेसिंग, प्रयोगशील शेती केंद्रस्थानी

नाशिक । दिनेश सोनवणे

नाशिक शहरासह जिल्ह्याला धार्मिक पर्यटनाचा मोठा वारसा आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देतात. द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या जिल्ह्याची ओळख वाईन सिटी म्हणून झाली. येथील शेती प्रयोगशील झाली; अनेक वायनरी या ठिकाणी आल्या. फूड प्रोसेसिंग कंपन्या, प्रयोगशील शेतीसोबतच नैसर्गिक संसाधनांचा मोठा ठेवा नाशिकला मिळाल्याने पर्यटकांचे जत्थे सध्या कृषी पर्यटनाकडे वळू लागले आहेत.

अलीकडच्या काळात नाशिकच्या शेतकर्‍यांनी प्रयोगशील शेती करण्याकडे आपला मोर्चा वळवलेला दिसतो. थायलंड, इस्त्राईल, व्हिएतनाममध्ये उत्पादन होणारे ड्रॅगन फ्रूटस्ची लागवडदेखील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात बघायला मिळाली. जिल्ह्यातील कसमादेसह, निफाड, येवला, दिंडोरी व सिन्नरमधील काही भागातील शेतकर्‍यांनी निर्यातक्षम उत्पादन घेतले. आदिवासी पाड्यांवरही पर्यटकांची मने रमू लागली.

शहरात राहणार्‍यांना गावाचे आणि शेतीचे आकर्षण असते. अ‍ॅग्रो टूरिझमसाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड तसेच नाशिकच्या जवळपासचा परिसराला पसंती मिळत आहे. बैलगाडी, घोडागाडी, नांगर धरण्याचा अनुभव, झोपडीतील निवास, भाकरी-भाजीचे जेवण आदी अनुभव शहरातील लोकांना घेता येत असल्याने आदिवासी पट्ट्यात अनेक पर्यटकांची संख्या वाढली आहे.

जिल्ह्यात धरणांची संख्या लक्षणीय आहे, तसेच किल्ल्यांचीही संख्या अधिक आहे. धार्मिक पर्यटनाच्या उद्देशाने आलेल्या पर्यटकास अनेक पर्याय उपलब्ध असल्याने तो जिल्ह्यात आल्यानंतर रमून जातो. शिवाय जिल्ह्यात अचूक नियोजन, दर्जेदार उत्पादन, गटशेतीचा अनोखा नमुना या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अनेकांनी रस दाखवला आहे.

भारतात गेल्या काही वर्षांपासून वाढलेला आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओढा आणि परदेशातील पर्यटकांच्या आवडी-निवडी व चोखंदळपणा पाहता कृषी पर्यटनाला खूप चांगले भविष्य आहे. कृषी पर्यटन अर्थात ङ्गअ‍ॅग्रो टूरिझमम हे ग्रामीण भारताचे रोजगारनिर्मितीचे महत्त्वाचे साधन असून या माध्यमातून छोट्या शेतकर्‍यांचे उत्थान आणि शाश्वत विकास शक्य आहे. प्रचंड क्षमता असलेले हे क्षेत्र भारतात अजूनही बाल्यावस्थेत आहे. यासाठी कृषी विभाग आणि पर्यटन विभागाकडून प्रयत्न होण्याची गरज आहे.


सोयीसुविधांसाठी पर्यटन विभाग सज्ज

नैसर्गिक संसाधने उपलब्ध असल्याने नाशिकमध्ये पर्यटक आल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यटनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे याठिकाणी पर्यटनाला चांगला वाव आहे. जिल्ह्यात धरणांची संख्या मोठी आहे; ज्या-ज्या ठिकाणी पर्यटकांचा राबता वाढेल त्या-त्या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयीसुविधा पर्यटन विभागाकडून पुरविण्यात येणार आहेत. यासाठी टूरिस्ट कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे.

– रामदास खेडकर, उपसंचालक पर्यटन विभाग, नाशिक


मोठी आर्थिक उलाढाल शक्य

कृषी पर्यटनातून वर्षाकाठी 20 ते 22 हजार कोटींची उलाढाल होऊ शकते. महाराष्ट्रात सुमारे 1700 च्या वर कृषी उत्पादक कंपन्या आहेत. ज्या भागात कृषी पर्यटनाला संधी आणि पूरक स्थिती आहे, अशा ठिकाणी कृषी पर्यटनाची अनेक केंद्र सुरू होऊ शकतील. शेतकर्‍यांना या पूरक व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. यासोबतच जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आपल्या कृषी क्षेत्रावर कृषी पर्यटनासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देतील ती ठिकाणेही पर्यटन केंद्र म्हणून पुढे उदयास येतील.

-विलास शिंदे, चेअरमन सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी


लक्षवेधी सेवरगाव, मधूमक्षिका उद्यान

कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी पिंपळगावातील मुखेड रस्त्यावर पूर्वा कंपनीकडून मधूमक्षिका उद्यान, बसवंत गार्डन आणि सेवरगाव हे आदर्श गाव साकारण्यात आले आहे. याठिकाणी येणार्‍या पर्यटकांसाठी फूडपोर्ट, म्युझियम, सेल्फी पॉईंट, विविध फुलझाडे, अ‍ॅपिअरी, मधमाशांविषयीची इत्यंभूत माहिती दिली जाते. तसेच येथील फूड प्रोसेसिंग युनिटदेखील बघता येते. सेवरगाव येथे पंचक्रोशितील अनेक शाळांच्या सहली यायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण गावात विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या वेळी अधिक आकर्षक असे दिसते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!