Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकृषिदूत : सोपा कानमंत्र

कृषिदूत : सोपा कानमंत्र

चिकूचे कलमी झाड तिसर्‍या वर्षापासून उत्पादन देत असले तरी फायदेशीर उत्पन्न मात्र सातव्या वर्षापासून मिळते. विशेष म्हणजे चिकूच्या झाडापासून वर्षभर फळे मिळतात. फळधारणेपासून फळे तयार होण्यास 150 ते 160 दिवस लागतात. काढणीच्या वेळी फळे मातकट तपकिरी बनून त्यावरील सूक्ष्म केस गळून फळ गुळगुळीत दिसते. तयार फळांच्या सालीवर नखाने ओरखडा काढल्यास पिवळसर रंग दिसतो आणि त्यातून पांढरा चिक येत नाही. कच्चे फळ असल्यास त्यावर पांढरा चिक येतो. फळे काढण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या अतुल झेल्याचा वापर करावा.

 पपईवरील चुरडा मुरडा हा रोग विषाणूमुळे होतो. यामुळे पपईची पाने हिरवी-पिवळी दिसतात. पानांवर तेलकट डाग दिसून येतात तसेच आकसल्यासारखी दिसतात. पानाचा आकार लहान होतो आणि ती लवकर गळून पडतात. फळांवर गोल चट्टे दिसतात आणि शेंड्याला कोवळ्या पानांचा गुच्छ तयार होतो. याचा प्रसार मावा या किडीमुळे होतो. यामुळे पानांची कर्ब ग्रहणाची क्रिया मंदावते आणि फळे बेचव, पाणचट लागतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपे तयार करते वेळेपासून काळजी घ्यावी. रोगट रोपे नष्ट करावी. मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 30 टक्के प्रभावी 200 मि.ली. किंवा फॉस्फोमिडॉन 85 टक्के प्रवाही 100 मि.ली. 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 15 दिवसांच्या अंतराने पुढील फवारण्या कराव्या. मुख्यत्वे काकडीवर्गीय भाजीपाल्याची पिके पपईजवळ घेऊ नयेत. 

- Advertisement -

 सर्वसाधारणपणे वळूचा उपयोग संकरासाठी करतात. वळू कार्यक्षम, चलाख, उत्साही राहण्यासाठी त्याला दररोज नियमित व्यायाम दिला गेला पाहिजे. अन्यथा वळू मंद, निरुत्साही होऊन निरुपयोगी ठरतो. वळूला दिवसातून एकदा दोन ते तीन किलोमीटर पळवून आणावे. त्यामुळे अनावश्यक चरबीचा नाश होऊन वळू सतेज होतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या