Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकृषिदूत : साखर उद्योगाच्या तोट्यात वाढ

कृषिदूत : साखर उद्योगाच्या तोट्यात वाढ

राज्यात यावेळी परतीच्या लांबलेल्या पावसानं विविध पिकांचं मोठं नुकसान झालं. उसाबाबतही असंच चित्र दिसून येत आहे. यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या साखर उद्योगाची चिंता वाढली आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना यंदा उसाची टंचाई भासत असल्यामुळं साखर उत्पादन घटून तोटे आणखी वाढतील, अशी भीती साखर उद्योगातून व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या हंगामात राज्यात 188 साखर कारखान्यांनी धुराडी पेटवली होती. यात 101 सहकारी, 87 खासगी कारखाने होते. त्यांनी नऊ कोटी 52 लाख टन इतकं विक्रमी गाळप केलं. गेल्या हंगामात राज्याचा सरासरी साखर उतारा 11.24 टक्के राहिला. तसंच एक कोटी सात लाख टन इतकं साखरेचं उत्पादन झालं. या पार्श्वभूमीवर उसाच्या टंचाईमुळं यंदाचं चित्र डळमळीत झालं आहे.

राज्यात यंदा पाच ते साडेपाच कोटी टन टन उसाचं गाळप होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आताचा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून 11 डिसेंबरपर्यंत राज्यात 63 लाख टन उसाचं गाळप झालं असून, 57 लाख क्विंटल इतकं साखरेचं उत्पादन झालं.

या काळातील साखरेचा उतारा सरासरी नऊ टक्के इतका राहिला आहे. राज्यात यावेळी मराठवाडा, नगर, सोलापूर भागात दुष्काळामुळे तर पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे उसाचं उत्पादन घटलं आहे.

त्यामुळे अपेक्षित गाळपासाठी साखर कारखान्यांना कसरत करावी लागत आहे. त्यातच आणखी एका समस्येची भर पडली आहे. ती म्हणजे उपलब्ध उसाची प्रतदेखील चांगली नाही.

साहजिक याचा साखरेच्या उतार्‍यावर, अपेक्षित उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे. दुसरीकडे साखरेच्या किंमतीबाबत असणारी अनिश्चितता साखर उद्योगासाठी अडचणीची ठरत आहे. या काही प्रमुख कारणांमुळे यावेळी साखर कारखान्यांचा तोटा वाढण्याची शक्यता दिसत आहे.

या परिस्थितीचा सरकारने वेळीच अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे. यंदा साखर उतारा कमी असल्यामुळं आणि उसाच्या वाहतुकीच्या खर्चात वाढ होणार असल्यानं शेतकर्‍यांना एफआरपीप्रमाणं पैसे देण्यातही कारखान्यांना अडचणी येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या