कृषीचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून

0

विशेष घटक योजना : शासनाकडून साहित्य खरेदीबाबत स्पष्ट सूचना नसल्याने अडचण

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने राबवण्यात येणार्‍या आर्थिकदृष्ट्या मागास असणार्‍या दलित बांधवांसाठीच्या विशेष घटक योजनेत कोट्यवधी रुपयांचा निधी सध्या तालुकास्तरावर पडून आहे.
या योजनेतील साहित्य संबंधित शेतकर्‍यांनी कोणत्या प्रकारचे, कोणत्या कंपनीचे, कोणत्या किंमतीनुसार घ्यावे, याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने योजना राबवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
जिल्हा परिषद कृषी विभागातून आर्थिकदृष्ट्या मागस असणार्‍या दलित बांधव शेतकर्‍यांसाठी विशेष घटक योजना राबवण्यात येते. या योजनेत मागासवर्गीय शेतकर्‍यांना विहीर खोदण्यापासून ते बैलजोडी आणि बैलगाडी खरेदीसाठी निधी देण्यात येतो.
दरवर्षी या योजनेत शेतकर्‍यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येता. गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत सदस्य अनिल कराळे यांनी विशेष घटक योजनेत कृषी विभागाने लाभार्थी निवडले असून यात संबंधित लाभार्थी शेतकर्‍यांना बैल जोडी खरेदी करण्यासाठी एप्रिल महिन्यांत निधी देण्यात आला.
मात्र, त्यानंतर आठ महिने उलटले तरी निवड करण्यात आलेल्या योजनेतील उर्वरित साहित्य घेण्यासाठी शेतकर्‍यांना निधी दिलेला नाही. या योजनेत शेतकर्‍यांना बैलजोडीसाठी 30 हजार, बैलगाडीसाठी 15 हजार आणि शेती अवजारे खरेदीसाठी 5 हजार रुपयांचा निधी देण्यात येतो.
शेतकर्‍यांना बैलजोडीसाठी निधी दिला आणि बैलगाडी आणि शेतकरी अवजारांसाठी निधी दिला जात नसल्याची तक्रार केली. यामुळे योजना अर्धवट राबवण्यात आली असल्याचे सदस्य कराळे यांचेे म्हणणे होते.
दरम्यान, कृषी विभागातून याबाबत अधिक माहिती घेतली असता बैलजोडी खरेदी करण्यासाठी विशिष्ट मानांकन नाही. मात्र, उर्वरित साहित्य खरेदीसाठी विशिष्ट मानांकनाची गरज आहे. बाजारात प्रत्येक साहित्याच्या अनेक कंपन्या आहेत.
या कंपन्यांच्या साहित्यांची किंमत आणि दर्जाचे वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. यामुळे शेतकर्‍यांनी कोणत्या कंपनीचे कोणते साहित्य खरेदी करावे, याबाबत सरकारकडून स्पष्ट मार्गदर्शन नसल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी सध्या पडून असल्याचे समोर आले आहे.

  विशेष घटक योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक दलित शेतकर्‍यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकार पातळीवर पाठपुरावा करण्यात येणार आहे. लवकरात लवकर या विषयावर सरकारला पत्र पाठवून मार्गदर्शन घेऊन हा प्रश्‍न सोडविण्यात येईल.- अजय फटांगरे, सभापती कृषी समिती जिल्हा परिषद.

  या योजनेत सरकारने मार्चएण्डपर्यंत मागसवर्गीय शेतकर्‍यांनी महामंडळामार्फत लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर यांना योजनेतील साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतर संबंधित लाभार्थी यांनी साहित्य खरेदी करून त्याच्या पावत्या कृषी विभागाला सादर केल्यानंतर कृषी अधिकारी त्याची खात्री केल्यानंतर लाभार्थ्यांना साहित्याची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करून देणार आहेत.

  2016-17 साठी जिल्हा परिषद कृषी विभागाने विशेष घटक योजनेसाठी 626 शेतकर्‍यांची निवड केेली होती. यात शेतकर्‍यांना गाय खरेदीसाठी प्रत्येक 30 हजार रुपये प्रमाणे 66 लाख 20 हजार रुपये, औजारे खरेदीसाठी 17 लाख 57 हजार, बैलगाडी खरेदीसाठी 22 लाख 20 हजार रुपये, विजेची मोटार खरेदीसाठी 39 लाख 50 हजार रुपये, इंजन खरेदीसाठी 6 लाख 60 हजार रुपये यासह अन्य योजनांसाठी लाखो रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

*