Type to search

Breaking News Featured नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : ‘करोना’नंतरचं कृषीक्षेत्र!

Share

सद्यस्थितीत नकारात्मक विचार केला तर सगळीकडे नैराश्य, हतबलता दिसेल. परंतू सकारात्मक आणि काहीसा धाडसी विचार केला तर ‘करोना’ने आपल्याला शेती व्यवसायाची पुनर्रचना करण्याची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. फक्त त्याकडे आपल्याला डोळसपणे पाहावे लागेल.

कृषीक्षेत्राचा विचार केला तर ‘कोरोना’च्या आधी जसे होते तसेच आपल्याला हवे आहे की या क्षेत्राच्या कार्यपद्धतीची पुनर्रचना करायची आहे ? हे प्रथम आपल्याला ठरवावे लागेल. ‘करोना’नंतरचा लढा म्हणजे निव्वळ विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणणे एवढाच नाहीये. कारण ‘कोरोना’ने जगातील सारे संदर्भ आणि गणिते बदलून टाकली आहेत.

‘वाईट’ काय काय घडलं याचा विचार करुन ‘चांगलं’ निर्माण करता येणार नाही. वाईटातलं चांगलं शोधावंच लागेल. आपण भारतीय शेतकरी ‘क्रिएटीव्ह’ आहोत. ‘इनोव्हेशन’ची कमतरता नाही. दुर्दैवाने आपल्या सर्वांचाच ‘ब्रेन वॉश’ होतो आहे. इंटरनेट आणि मिडीयामुळे आपलं ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करणंच थांबलं आहे. त्यासाठी नकारात्मकतेचा, निराशेचा सूर आळवणं थांबवून चाकोरीबाहेरचा विचार केला तर कधी नव्हत्या एवढ्या संधी आपल्याला अचानक उपलब्ध झालेल्या दिसतील.

निवडीचे असीम स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झाले असून, कुठल्या दिशेने नव्याने वाटचाल सुरु करायची हे आता सर्वस्वी आपल्या हाती आहे. शेती व्यवसायातील रुतलेल्या अर्थचक्राला गती देण्याआधी कुठल्या प्रकारची आर्थिक सुबत्ता, रचनात्मक कार्यपद्धती आपल्याला हवी आहे याचा सखोल विचार करुन अल्पकालीन आणि दिर्घकालीन उद्दिष्ट्ये निश्चित करावी लागतील. आणि या उद्दिष्टांपासून भरकटत आहोत असे कुठल्याही टप्प्यावर वाटले, तर तत्क्षणी आपल्या व्यवस्थेतील, कार्यपद्धतीतील त्रुटी दूर कराव्या लागतील.

नव्याने सर्व काही सुरु करण्याची सुवर्णसंधी आपल्याला ‘कोरोना’ने दिली आहे. शेती व्यवसाय असो किंवा नर्सरी, निर्यात उद्योग किंवा प्रक्रिया उद्योग असो,…व्यवसाय सुरळीत करण्याच्या नावावर पुन्हा तीच वाट चोखाळणे आपल्याला परवडणार नाही.

आता फेरस्थापना नको, फेरमांडणी हवी आहे. फेरमांडणी आराखड्याच्या केंद्रस्थानी ‘सामाजिक उद्यमशीलता’ हा नवा प्रकार असावा असे मला वाटते. एक व्यक्ती, गट, स्टार्ट-अप कंपन्या किंवा उद्योजकांसाठी ‘सामाजिक उद्यमशीलता’ (Social Entrepreneurship) हा एक व्यवहार्य आणि क्रांतीकारक दृष्टीकोन ठरु शकतो. आकार, उद्दीष्टे आणि स्थान भिन्न असलेल्या या संघटनांच्या विस्तृत श्रेणीवर ही संकल्पना लागू केली जाऊ शकते.

ज्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक किंवा पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करणे, शेतकऱ्यांना शिक्षीत, प्रशिक्षीत करणे, वित्तपुरवठा सुलभ, पारदर्शी करणे तसेच शेतकऱ्यांना सहाय्यभूत होईल अशी संपूर्ण मुल्यवर्धित साखळी उभी करणे यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. शेतकऱ्यांनी उत्पादनातील गुणवत्तेत सुधारणा करुन शेतीमाल विक्रीचे नवनविन तंत्र आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. ‘सामाजिक उद्यमशीलता’चे ध्येय फक्त नफा कमवणे नसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हा असेल.

याकामी केंद्र आणि राज्यशासनाने पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. यामध्ये कृषीक्षेत्राच्या फेरमांडणीची संकल्पना ठरवणे, शेती व शेतीपुरक प्रकल्प – उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि अशा उद्योगांना पोषक वातावरण तयार करुन देण्यासाठी प्रभावी रणनीती आखण्याचे काम अग्रक्रमाने सुरु करावे लागेल. असं घडलं तर बळीराजा पुन्हा उभा राहील. ‘कोरोना’नंतरचं शेतकऱ्यांचं जगणं फक्त सुसह्य होणार नाही तर भारतीय शेतकऱ्यांची सबलीकरणाच्या दिशेने नव्याने वाटचाल सुरु होईल.

– मनोज दंडगव्हाळ, (लेखक कृषीक्षेत्रात व्यावसायिक सल्लागार आहेत)

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!