शेवटच्या दिवशीही पारनेरमधील कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

0

विरोधकांच्या बहिष्कारानंतरही बाजार समितीला यश

अहमदनगर (प्रतिनिधी) – पारनेर बाजार समितीत आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला शेवटच्या दिवशीही शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने हे प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले.
पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या संकल्पनेतून हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीला हे प्रदर्शन होऊ नये, यासाठी बाजार समितीतील काही सदस्यांनी विरोध केला. त्यांच्या जोडीला काँग्रेसच्या एका गटाने साथ दिली. त्यामुळे हे प्रदर्शन यशस्वी होते की नाही, अशीच चर्चा तालुक्यात सुरू झाली होती.
परंतु बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड व त्यांच्या संचालक मंडळाने हे प्रदर्शन यशस्वी करण्याचा विडा उचलला. त्यामुळे हे प्रदर्शन यशस्वी झाले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तालुक्यातील शेतकर्‍यांनी कृषी प्रदर्शनाला भेट कृषीच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
पारनेर तालुक्याची ओळख कांद्याचे आगर म्हणून आहे. त्यामुळे या प्रदर्शनामध्ये कांद्याबाबत मार्गदर्शन करणारे स्टॉल उभारण्यात आलेले होते. या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकर्‍यांना कांदा उत्पादन कोणत्या वाणाची निवड करावी, तसेच खते कोणती वापरावी, याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे आगामी काळात पारनेर तालुक्यात कांद्याचे उत्पादन वाढलेले दिसून येणार आहे.
खते, बी-बियाणे आदींबरोबर विविध प्रकारची स्टॉल यामध्ये उभारण्यात आली होती. विशेष म्हणजे महिला बचत गटांनाचे स्टॉल उभारण्यात आल्याने कृषी तंत्रज्ञानाच्या माहितीबरोबरच शेतकर्‍यांना इतर वस्तू खरेदी करता आल्या. त्याबरोबरच या प्रदर्शनात खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते.
या स्टॉललाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या प्रदर्शनात भेटी देणार्‍या शेतकर्‍यांसाठी लकी ड्रॉ काढला जात होता. प्रत्येक तासाला लकी ड्रॉ काढण्यात आल्याने काहींना यामध्ये बक्षिसे मिळालेली आहेत. याबरोबरच बाजार समितीच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर शेतकर्‍यांना आपला अभिप्राय नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.
तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी हे प्रदर्शन उत्कृष्ट होते, असेच प्रदर्शन वारंवार पारनेरमध्ये भरविण्यात यावे, अशी अपेक्षा आपल्या अभिप्रायात व्यक्त केली आहे. कृषी तंत्रज्ञानाची माहिती इतकी आहे की, असे प्रदर्शन वारंवार भरविण्यात यावे, उशिरा का होईना बाजार समितीने हे प्रदर्शन भरविण्यास सुरुवात केली आहे. हे चांगले आहे. या पुढेही असेच प्रदर्शन भरविण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करून शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या सभापतींचे आभार मानले.

LEAVE A REPLY

*