Thursday, April 25, 2024
Homeनगरखते, बियाणांचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करा – ना. भुसे

खते, बियाणांचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करा – ना. भुसे

सार्वमत

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना कोणत्याही परिस्थितीत बी-बियाणे, खते, किटकनाशके यांची टंचाई जाणवू नये, यासाठी पूर्ण नियोजन केले आहे. सर्व घटकांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. तसेच, घरगुती बियाणांचा वापर करण्यापूर्वी त्यांची उगवण क्षमता तपासण्याचे निर्देश कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. खते आणि बियाणांचा काळाबाजार करण्याचे प्रकार घडले तर अशा दुकानदार आणि कंपन्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले.
कृषीमंत्री भुसे यांनी गुरूवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या खरीप हंगाम तयारीसंदर्भात आढावा घेतला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खा. सदाशिव लोखंडे, आ. आशुतोष काळे, आ. निलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यावेळी उपस्थित होते.
कृषीमंत्री भुसे म्हणाले, शेतकर्‍यांनी केवळ एकाच कंपनीच्या खते अथवा बियाणांचा आग्रह धरू नये. खतांचा अतिवापर करताना जमीनीचा पोत बिघडणार नाही, याची काळजीही घेतली गेली पाहिजे. यावर्षी जिल्हयातील शेतकर्‍यांना सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. घरगुती बियाणांचा वापर करताना त्याची उगवण क्षमता तपासावी.
प्रत्येक गावात कृषीसेवक यांच्यावर ती जबाबदारी द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. पीक विमा आणि हवामानाधारित फळपीक विमा योजनेचा लाभ कसा मिळेल, यादृष्टीने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील हमीभाव केंद्रे सुरु करण्याच्या सूचना त्यांनी पणन आणि सहकार विभागाला दिल्या. शेतकर्‍यांच्या मालाचे नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा पातळीवरील या केंद्रांनी तातडीने पावले उचलावीत, असे ते म्हणाले. या बैठकीला अधिकार्‍यांसमवेत कृषी सभापती, प्रगतीशील शेतकरी प्रतिनिधी, बियाणे आणि खत विक्रेत्यांचे प्रतिनिधी हजर होते. कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनी आभार मानले
- Advertisment -

ताज्या बातम्या