Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखअंधश्रद्धांचे ग्रहण मात्र सुटेना !

अंधश्रद्धांचे ग्रहण मात्र सुटेना !

विश्वात अनेक चमत्कार नेहमीच घडतात. मानव म्हणजे पृथ्वीवरील एकमेव हुशार प्राणी ! साहजिकच त्याचे कुतूहल नेहमीच जागे असते. चंद्र-सूर्य ग्रहणे वर्षानुवर्षे होत आहेत. ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश-सावलीचा आणि खगोलांच्या सापेक्ष स्थानांचा खेळ! खगोलशास्त्राचे तज्ञ व अभ्यासकांसाठी ग्रहणांचे रहस्य उलगडण्यासाठी पर्वणीच! तरीसुद्धा ग्रहणांबाबत पुरातन काळापासून अनेक गैरसमज आजही कायम आहेत. आजच्या आधुनिक काळात सुशिक्षित माणसेदेखील त्या अंधश्रद्धांना डोळसपणे कवटाळतच आहेत. प्रत्येक ग्रहणावेळी त्याचा प्रत्यय येतो. नुकतेच झालेले कंकणाकृती सूर्यग्रहणसुद्धा त्याला अपवाद नव्हते. लहानथोरांनी सुरक्षित चष्म्यांतून सूर्यग्रहण पाहिले. ठिकठिकाणच्या सेवाभावी संस्थांनी ग्रहण निरीक्षण शिबिरे भरवली. परंपरेने चालत आलेल्या अंधश्रद्धाही तत्परतेने पाळल्या गेल्या. ग्रहणानंतर आंघोळ करून शुचिर्भूत होण्याची भाऊगर्दी जागोजागी नद्यांवर उसळली होती. गर्भवतीने ग्रहणकाळात कोणतेही काम करू नये, कोणीही खाऊ-पिऊ नये आदी भंपक रिवाजही कसोशीने पाळले गेले. काही जबाबदार व्यक्ती व संस्थांनीसुद्धा त्याला हातभार लावला. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने ग्रहणकाळात नळाला पाणी न सोडण्याचा निर्णय घेऊन अंधश्रद्धेचे महादर्शन घडवले. दुसरी घटना तर याहून भारी! रणजी क्रिकेट सामनेसुद्धा ग्रहणकाळात थांबवले गेले. मुंबई व राजकोटचे क्रिकेट सामने दोन तास उशिराने सुरू करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. खेळाडू व अधिकार्‍यांच्या सुरक्षेचे तकलादू कारण त्यासाठी दिले गेले. कर्नाटकातील काही गावांत अंधश्रद्धाळू माता-पित्यांनी त्यांच्या अपंग मुलांना गळ्यापर्यंत मातीत गाडले. कोणकोणती दुखणी त्यामुळे बरी होणार हे देवालाच माहीत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक सप्तशृंगीदेवी! त्या मंदिरातील गाभारादर्शन एक जानेवारीपासून बंद करण्याचा शहाणा निर्णय तेथील न्यासाने घेतला आहे. भाविकांत समानता राहावी व मंदिराचे पावित्र्य टिकावे, हा यामागचा हेतू आहे, असे सांगण्यात आले. मात्र आरतीचा मान असलेले यजमान, पुजारी व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सोवळ्यात गाभार्‍यात दर्शनाची मुभा दिली जाणार आहे, असेही समजते. या पार्श्वभूमीवर ‘देवाचिया द्वारी’ कोणताही प्रोटोकॉल न पाळण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळानेच करायला हवा. एखाद्या देवस्थानाने खुशमस्करीसाठी विशेष दर्शनाची संधी देऊ केल्यास ती मंत्र्यांनी नम्रपणे नाकारली पाहिजे. ‘तुम्ही कोणी काही बोला… आम्हाला हवे तसेच आम्ही करू’ असे म्हणणार्‍यांचा सध्या जमाना आहे. देशाच्या केंद्रसत्तेतील सरकारसुद्धा अंधश्रद्धांना कवटाळून आहे. सरकारी पक्षात अंधभक्तांची संख्याही कमी नाही. कोणी साक्षी महाराज, कोणी प्रज्ञावान, कोणी गिरीराज अशा अनेक गणंगांचे उपद्व्याप आणि शिव्याशाप वरचेवर माध्यमांत झळकतात. कोणी मंत्री विदेशात जाऊन राफेल विमानाच्या सुरक्षेसाठी लिंबू-नारळ वाढवतो (फोडत नाही). एकविसाव्या शतकातील सुजाण समाजाला लागलेल्या अंधश्रद्धेच्या या ग्रहणातून देशाची आणि जनतेची सुटका कधी होणार? कोण करणार?

मराठीचा सानुग्रह आग्रह !

- Advertisement -

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडचे भूमिपुत्र! उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्रीसुद्धा! आग्रा विद्यापीठातून इंग्रजी विषयात आचार्य पदवी त्यांना मिळाली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा हाती घेतल्यापासून मराठी मातीशी स्वत:ला जोडून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करीत आहेत. मध्यंतरी राजकीय सत्तासंघर्षावेळी कोश्यारी बरेच चर्चेत आले होते. आता ते मराठी भाषेबद्दल आत्मियता व्यक्त करून चर्चेत आले आहेत. मराठी भाषेबाबत त्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. ‘इंग्रजीचा वापर करायला हरकत नाही. मात्र स्थानिक भाषांचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे. येथे मराठी भाषा सर्वांना यायलाच हवी’ असे ज्वलंत विचार कोश्यारी यांनी सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात व्यक्त केले. ‘महाराष्ट्राचा राज्यपाल झालो हे माझे भाग्य आहे. मराठी भाषा मला समजते, पण बोलता येत नाही, याची खंत वाटते. प्रत्येकाला संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी, बंगाली यासह इतर भारतीय भाषाही यायला हव्यात’ असेही कोश्यारी म्हणाले. मी उत्तराखंडमधून आलो असलो तरी मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो. शिकायला वयाचे बंधन नसते. शिकण्याची फक्त तयारी हवी. राज्यपालांनी त्याचा प्रत्यय दिला आहे. अभूतपूर्व राजकीय महानाट्यानंतर सत्ताबदल घडून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस याविषयी अभिमान बाळगणार्‍या पक्षाकडे सरकारचे नेतृत्व आहे. राज्यपालांनी मराठीविषयी वक्त केलेल्या विचारांनी सरकारमधील कारभारी मंडळी सुखावली असतील. एक अमराठी व्यक्ती मराठी भाषेचा आग्रह धरते, याबद्दल मराठी जनतेलासुद्धा आनंद वाटेल. महाराष्ट्रात राहायचे असल्यास मराठी भाषा आलीच पाहिजे, याविषयी आजवर काही राजकीय सेनानींनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र मराठीप्रेमाचा हा उमाळा संबंधित नेत्यांना सोयीनुसार येतो. एखाद्या राजकीय नेत्याने मराठीविषयी बोलणे व राज्यपालपदासारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीने बोलणे यात बराच फरक आहे. त्यादृष्टीने कोश्यारी यांची सूचना समयोचित आहे. येत्या काळात राज्य सरकारकडून मराठीविषयी कदाचित आग्रही भूमिका घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजदरबारी मराठीची आजवर दैनाच झाल्याचे मराठी जनतेने वर्षानुवर्षे अनुभवले आहे. मराठीला मान-सन्मानाचे दिवस अजूनही आलेले नाहीत. राज्यपालांचा उपदेश ‘देखल्या देवा दंडवत’ असा मानला जाऊ नये. त्यांनी विधिमंडळात मराठीतून अभिभाषण करून त्यांचा दृष्टिकोन सक्रियतेने स्पष्ट केला आहे. आधीच्या अमराठी राज्यपालांची भाषणे प्रामुख्याने इंग्रजीत होत असत. आता परिस्थिती बदलत आहे. ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीचा परिचय राज्यपाल कोश्यारी यांनी मराठी जनतेला दिला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

- Advertisment -

ताज्या बातम्या