समृद्धी बाधितांनी दिला जिल्हाधिकार्‍यांना शेतमाल भेट; बागायती जमीन वगळण्याची मागणी

0
नाशिक । नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग प्रकल्पात नाशिक जिल्हयातील बागायती जमीनींचे संपादन करण्यात येत असून यामुळे पिकाउ व बागायती जमीनधारक उध्दवस्त होणार आहे. त्यामूळे या प्रकल्पाला विरोध करत आज येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना शेतमालाची भेट देत बागायती जमीनी या प्रकल्पातून वगळण्याची मागणी केली. याबाबत आपल्या भावना शासनापर्यंत पोहचवु असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

समृध्दी महामार्गात नाशिक जिल्हयातून 101 किलोमीटरचा सामावेश आहे. याकरीता सुमारे 200 हेक्टर जमीनीचे संपादनही करण्यात आले असून शासनाने भुसंपादन कायद्यान्वये संपादन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. या महामार्गाला जिल्हयातून सुरूतीपासूनच विरोध होत आहे. मात्र तरीही शेतकर्‍यांचा विरोध डावलून प्रशासनाने जमीनी संपादन सुरू केल्याने शेतकरयांमध्ये शासनाविरोधात रोष आहे.

याचाच निषेध म्हणून आज ज्या बागायती जमीनी या प्रकल्पात बाधित होत आहे तेथील शेतकर्‍यांनी आपल्या जमीनीत पिकवलेला शेतमाल घेउन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशव्दारावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. समृध्दी महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले यांना सुरूवातीला पोलीसांनी ताकिद दिली. दूपारच्या सुमारास आंदोलक शेतकरी शेतमाल घेउन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. बैठक सुरू असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी प्रथमतः या शेतकर्‍यांना भेट नाकारली.

त्यामूळे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना भाजीपाला भेट देण्यात आला. मात्र यावेळी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीचा आग्रह धरला. अखेर जिल्हाधिकार्‍यांनी शेकर्‍यांना वेळ देत त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना भाजीपाला भेट देत बागायती जमीनींची पाहणी करण्याची मागणी केली तसेच या प्रकल्पातून या जमीनी वगळण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत आपल्या भावना शासनापर्यंत पोहचवू असे आश्वासन जिल्हाधिकारयांना दिले. यावेळी सोमनाथ वाघ, भास्कर गुंजाळ, शांताराम ढोकणे, अरूण गायकर, उत्तम हारक, भागवत गुंजाळ, रतन लांगडे, शिवाजी भोसले, अरूण गायकर, विजय कडू, दौलत दुभाषे, सोमनाथ तातळे, बबन वेलजाळी, सुचेंद्र मिलखे आदिंसह समृध्दी बाधित शेतकरी उपस्थित होते.

तीन हजार शेतकरी होणार उध्दवस्त : जिल्हयातून 101 किलोमीटरचा या महामार्गात सामावेश आहे. पुर्वीच्या महामार्गाचे अंतर 10 किलोमीटर आहे. 7 किलोमीटरसाठी 3 हजार शेतकरी पिकाउ व बागायती जमीनधारक उध्दवस्त होणार आहे. आज शिवडेसह इगतपुरीत टोमॅटो, कोबी, फलॉवर, सिमला मिर्ची, उस, भात, कांदे, काकडी आदि पिके उभी आहेत. सर्व माल निर्यातक्षम असून एक एकर मध्ये दहा ते बारा लाख रूपये उत्पन्न मिळते. इतका मोबदला समृध्दी जमीन संपादनापोटीही मिळत नसल्याचे शेतकरयांनी यावेळी सांगितले त्यामूळे बागायती जमीन या प्रकल्पातून वगळण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सरकार शेतकरी विरोधी : काही दिवसांपूर्वी नाशिक भेटीवर आलेल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी समृध्दी बाधित शेतकर्‍यांच्या बाबत निश्चितपणे आश्वासक पाउल उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच याबाबत चर्चा करण्याचेही आश्वासन दिले मात्र मुख्यमंत्र्यांना शेतकर्‍यांचा विसर पडला असून सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याचा आरोपही यावेळी प्रकल्प बाधित शेतकर्‍यांनी केला.

LEAVE A REPLY

*