‘राज्यराणी एक्सप्रेस’प्रकरणावरून गोयल यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन

‘राज्यराणी एक्सप्रेस’प्रकरणावरून गोयल यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्रातील कर्मचारी व रेल्वे प्रवाशांसाठी प्रतिष्ठेची असलेली राज्यराणी एक्सप्रेस मनमाड ऐवजी नांदेडहून सोडण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी माथाडी व कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांच्यासह कार्यकर्त्यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला.

नाशिक जिल्ह्यातील कर्मचारीवर्ग पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करत असतो. पंचवटी एक्सप्रेसमधील वाढती गर्दी बघता राज्यराणी एक्सप्रेस सुरु करण्यात आली. कर्मचारी वर्ग, उद्योजक, व्यावसायिक, चाकरमाने, विद्यार्थी व मुंबई येथे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी राज्यराणीलाही मोठी पसंती दाखवली.

विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील प्रवाश्यांना ही एक्सप्रेस सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचविते. पहाटे साडेपाचला सुटणारी व वेळेवर पोहोचविणारी ही विश्वासू व सोयीची अशी या एक्सप्रेसची ओळख आहे.

तसेच मुंबईतील सर्व कामे आटोपून सायंकाळीसहानंतर परत मनमाडला येण्यासाठी मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस महत्वाचीगाडी आहे.

ती रात्री सव्वाअकरापर्यंत मनमाडला येते त्यामुळे नाशिक, निफाड, लासलगाव, मनमाड, मालेगाव, नांदगाव, येवला आदि भागांतील रोज प्रवास करणारे कर्मचारीवर्ग व प्रवाशी या गाडीने प्रवास करतात. आता हि गाडी मनमाड ऐवजी नांदेडवरून सुटणार असल्याने गाडीला हमखास उशीर होईल.

तसेच वाढत्या गर्दीमुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनाही गैरसोयी होईल. या मनमानी व एकतर्फी निर्णय जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्याविरुद्धच हे जोडे मारो आंदोलन करत असल्याचे राष्ट्रवादी माथाडी व कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष गणेश पवार, आकाश खंदारे, बाळू घाटोळ, सागर पाटील, बॉबी पाटील, बबन जाधव, सचिन चव्हाण, अंकित भडांगे, सुनिल सोनवणे, आकाश घाटोळ, रोशन राजपूत, कैलास पारवे, आकाश नेटके, अक्षय पहाडे, विजय बघे,आदींसह मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com