Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

आघाडी-शिवसेनेत फॉर्म्युल्यावर खलबतं

Share

चकवा देत मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक !

मुंबई- राष्ट्रपती राजवटीमुळे सत्तास्थापन करण्यास बराच कालावधी मिळाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आता सत्तावाटपाच्या सूत्रावर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काल या पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू होता. सत्तेच्या नव्या सूत्रानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद घेणार असून काँग्रेसला पाच वर्षे उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. सत्तेचा समान वाटा मिळण्यावर दोन्ही काँग्रेसने आग्रह धरल्याने हा तोडगा काढण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, नव्या फॉर्म्युल्यावर या तिन्ही पक्षांची सहमती झाल्यावरच सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीच्या बैठकीपूर्वीच काही तरी बिनसल्याने राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार सायंकाळी प्रचंड वैतागले दिसत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यानंतर ते तडकाफडकी बारामतीच्या दिशेने निघाले. समन्वय समितीची बैठकही रद्द झाल्याचं त्यांनी सांगितल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क केले जात होते. पण या सगळ्या बातम्या पाहून स्वत: शरद पवार मात्र चांगलेच संतापले. कारण त्यांनी त्यानंतर तात्काळ आपल्या घराबाहेर येऊन माध्यमातील कर्मचार्‍यांवर आपला संताप व्यक्त केला. पण यावेळी पवार असं देखील म्हणाले की, मीडियाच्या गाड्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अजित पवार हे गंमतीने असं म्हणाले की, ते बारामतीला चालले आहेत. पण ते मुंबईतच आहेत आणि उद्या तुम्हाला भेटतील.

काही वेळानंतर आघाडीची बैठक सुरू झाली. त्याबैठकीस खुद्द अजित पवारांसह जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, तर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. उद्याही बैठक होणार असून त्यातही चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काल मध्यरात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यावेळी शिवसेनेने स्वत:साठी पाच वर्षां करिता मुख्यमंत्रिपद मागितले असून दोन्ही काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला सूचवला आहे. मात्र त्याला राष्ट्रवादी तयार नसल्याचं सांगण्यात येते. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांमध्ये थोड्याच जागांचं अंतर असल्याने राष्ट्रवादीलाही मुख्यमंत्रिपद हवं आहे. सुरुवातीचे अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेला देण्यात आल्याचं समजतं. ठाकरे-पटेल यांच्या दरम्यानच्या चर्चेत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. उद्धव ठाकरे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यात पाच वर्ष स्थिर सरकार राहावं म्हणून महामंडळासह सर्व मंत्रिपदांचे समसमान वाटप करण्यात येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 14 मंत्रिपदे देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येतं. दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादीला अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याच्या आणि काँग्रेसला पाच वर्षासाठी उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या नव्या फॉर्म्युल्यावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा करणार असून त्यानंतरच निश्चित चित्रं स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मध्यावधी नाहीच, सरकार स्थापन होणार

शेतकर्‍यांना दिलासा द्या, पवारांचा आमदारांना सल्ला

मुंबई – महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थिरतेचं चित्र आहे. राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मध्यावधी निवडणुका लागणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असे स्पष्ट करत आमदारांनी चिंता करू नये, असे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचं समीकरण जुळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी आता आपल्या मतदारसंघात जाऊन कामाला सुरुवात करावी. अवकाळी पावसात शेतकर्‍यांचे जे नुकसान झाले आहे, त्याबाबत त्यांना दिलासा देण्याचे काम करावे. आपण ज्या मतदारसंघात निवडणूक जिंकली आहे तिथे जाऊन नेत्यांनी आभार दौरे करावेत, अशा सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांना दिल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!