Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशलॉकडाउननंतर शाळा, महाविद्यालयांसाठी ‘सोशल डिस्टेंसिंग’ नियमावली

लॉकडाउननंतर शाळा, महाविद्यालयांसाठी ‘सोशल डिस्टेंसिंग’ नियमावली

सार्वमत

नवी दिल्ली – लॉकडाउननंतर शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सामाजिक अंतराची (सोशल डिस्टेंसिंग) नियमावली मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून (एमएचआरडी) तयार करण्यात येत आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवणे, वसतिगृह, खानवळ आणि वाचनालयासाठी नवी नियमावली बनवण्याचे आदेशही मंत्रालयाने दिले आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने करोनानंतर शाळा, कॉलेज सुरू होतील तेव्हा विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजनांची नियमावली तयार करण्यासाठी एक समिती नेमली आहे. या समितीने या शिफारशी केल्याचे समजते.

- Advertisement -

दरम्यान देशातील करोना विषाणूच्या संकटामुळे 16 मार्चपासून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 24 मार्च रोजी देशात लॉकडाऊनघोषित करण्यात आले असून ते आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.
दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याची यापूर्वीच शिफारस केली आहे. तर विविध माध्यमांच्या वतीने शाळांनीही शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानंतर आता एमएचआरडीकडूनशाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्यानंतर सामाजिक अंतराबाबतची नियमावली तयार केली जात आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शाळांसाठी तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांसाठी मार्गदर्शत तत्त्वे तयार केली जात आहेत. दरम्यान मुंबईतील पालिका शाळा तसेच इतर शाळांमध्ये एका वर्गात किमान 60 विद्यार्थ्यांचा पट तरी असतो मात्र सोशल डिस्टेंसिंगच्या नियमानूसार एका वर्गात 12 ते 13 विद्यार्थीच बसू शकतात. यामुळे मुंबईत हे सर्व अवघड होणार असून याबाबत शासनाने योग्य ते मार्गदर्शन करावे अशा आशयाचे पत्र मुंबईतील एका शिक्षकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

नियमावलीत काय आहे?
नियमावलीमध्ये संस्थांनी त्यांच्या वेळापत्रकात तसेच वर्ग नियोजनात लवचिकता ठेवणे अपेक्षित आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असणे अपेक्षित आहे. तसेच संपूर्ण संस्थेत सामजिक वावराचे नियम पाळले जातील असेही यात सूचित केले आहे. हे सर्व नियम पाळण्यासाठी गरज असल्यास एका दिवशी एका इयत्तेचे वर्ग भरवणे, व्हर्च्युअल क्लासरूम, मैदानांमध्ये तसेच शाळांच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करताना सुरक्षित वावराचे नियम पाळणे आवश्यक राहणार आहे. तसेच स्वच्छतागृहातही सुरक्षा उपाय कसे पाळावेत याबाबात नेमके काय करायचे काय नाही करायचे? याबाबतची नियमावली तयार केल्याचेही सूत्रांनी सांगितले. तसेच शाळेच्या गणवेशामध्ये मास्कचा समावेश करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. तर निवासी शाळांमध्ये वस्तीगृह, खानावळ येथे सामाजिक वावर नियमांचे पालन करावे असेही सूचित करण्यात आले आहे. आयआयटीसारख्या संस्थांमध्ये वर्ग दिवसातून दोन वेळा भरवण्यापासून विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. तर ऑनलाइन वर्गावरही विशेष भर देण्याबाबत विचार सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या