नाशिकमध्ये विधान परिषदेसाठी सेनेचा तिसराच उमेदवार

अ‍ॅड. सहाणे यांंचे आरोप बिनबुडाचे; सेनेकडून पत्रकार परिषदेत खुलासा

0

नाशिक । विधान परिषदेच्या नाशिक जागेसाठी अद्यापही शिवसेनेचा उमेदवार पक्षाने जाहीर केलेला नाही. तरीही नरेंद्र दराडे यांची उमेदवारी निश्चित झाली असे सांगत सोशल मीडियात प्रचार करणारे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांचे वर्तन अशोभनीय आहे. नेत्यांवर पैशाचा झालेला आरोप चुकीचा असून, सेनेला बदनाम करणार्‍याचे राजकारण कोणी करू नये. विधान परिषद निवडणुकीसाठी अजून कोणी तिसराच उमेदवार असू शकतो. राज्यात भाजपसोबत युतीचा निर्णय पक्ष प्रमुख घेतील, असे स्पष्टीकरण आज शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांनी दिले.

शिवसेनेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांची सेनेतून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. या प्रकारानंतर आज शिवसेना जिल्हा पदाधिकारी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत अ‍ॅड. सहाणे यांच्या आरोपाला उत्तर दिले. या पत्रकार परिषदेला सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, जगन आगळे, विनायक पांडे, बाळासाहेब कोकणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अ‍ॅड. सहाणे यांनी दिलेली माहिती व केलेले आरोप खोटे असल्याचे सांगत गायकवाड म्हणाले, विधान परिषदेच्या उमेदवारीसंदर्भात मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर जिल्ह्यातील चार आमदार, तीन जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख आपण, सुधाकर बडगुजर, संपर्क प्रमुख असे सर्वजण उपस्थित होते.

यात प्रथम झालेल्या चर्चेत दराडे यांच्या बाजूने पदाधिकार्‍यांनी कौल दिला होता. या बैठकीनंतर पक्ष प्रमुखांनी एक-दोनच्या गटाने पदाधिकार्‍यांना स्वंतत्र बोलावून उमेदवारांसंदर्भात माहिती घेतली. तेव्हापासून आतापर्यत पक्ष प्रमुखांनी विधान परिषदेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. असे असतांना दराडे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगत अ‍ॅड. सहाणे यांनी स्वत:चाही प्रचार सुरू केला. या कथित वादानंतर आजपर्यंतदेखील पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना नेते संजय राऊत मराठा विरोधात असल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगत गायकवाड म्हणाले, जिल्ह्यात आमदारांत सेनेचे जास्त आमदार असून; महापालिकेतील नगरसेवक, जिल्हा परिषदेत व पंचायत समिती सदस्यांत देखील मराठा लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. पक्षाला मराठा समाजाच्या अडचणी व प्रश्न माहिती असून, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हीच भूमिका पक्षाने मांडली आहे.

मागील वर्षी मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने राजकारण बाजूला ठेवून, मराठा समाज म्हणून सेनेचे सर्वच पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. तरीही सेनेला बदनाम करण्याचे राजकारण केले जात आहे. आपणही सेनेत येण्यापूर्वी मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मराठा महासंघाचे काम केले आहे. तसेच क्रांती मोर्चानंतर घडलेल्या काही घटनांत मराठा समाजातील युवकांवर खोटे गुन्हे दाखल झाले, त्यावेळी आम्ही या युवकांना मदत केली. काही सेनानेते सांगतील, म्हणून पक्षप्रमुख निर्णय घेतील असे पक्षात होत नाही. खा.राऊत हे उत्तर महाराष्ट्राचे नेते असल्याने त्यांच्यावर झाले आहे. कोणत्याही पक्षातून एखाद्याची हकालपट्टी झाली की, ही मंडळी पक्षावर आरोप करते, असा हा प्रकार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*