‘केदारेश्‍वर’ देणार रोख पेमेंट : अ‍ॅड. ढाकणे

0

कारखाना प्रशासनाचा निर्णय; मोहटादेवी शुगरकडे केदारेश्‍वर भाडेतत्वावर

चापडगाव (वार्ताहर) – केदारेश्वर साखर कारखाना प्रशासनाने चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना लगतच्या साखर कारखान्याच्या बरोबरीने भाव देऊन रोख स्वरूपात पेमेंट देण्याचा संकल्प केला आहे. शासनाच्या धोरणामुळे साखर व्यवसाय अडचणीचा बनत चालला असला तरी संचालक मंडळाने चालू गळीत हंगाम पूर्णपणे यशस्वी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केदारेश्‍वरचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी दिली.

शेवगाव तालुक्यातील सुमननगर येथील केदारेश्वर साखर कारखाना या हंगामात मोहटादेवी शुगर मिल्सला भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आला असून यावर्षीचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, उद्योगपती माणिकचंद दुगड, अध्यक्ष अतुल दुगड, किर्तीराज दुगड यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. प्रताप ढाकणे बोलत होते.

यावेळी माजी उपाध्यक्ष माधव काटे, सुरेशचंद्र होळकर, भाजपा किसान आघाडीचे अध्यक्ष तुषार वैद्य, चेतन दुगड, सुनील देसरडा, दीपक लुणावत, बाबू सोलंकी, गोरख चौधरी, संचालक बापूराव घोडके, रणजीत घुगे, विठ्ठल अभंग, श्रीमंत गव्हाणे, बळीराम खरात, सीताराम खरात, माजी कृषी अधिकारी विजय पाटील रामजी अंधारे, बंडू बोरुडे, यादवराव क्षीरसागर, प्रभाकर चेमटे, व्यवस्थापक वजीर सय्यद, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, तीर्थराज घुंगरड, पोपट केदार आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. प्रताप ढाकणे म्हणाले, यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने भविष्यात कार्यक्षेत्रात उसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. उसाची उपलब्धता असल्याने चालू हंगाम यशस्वी होणार आहे. शेतकरी अडचणीत असल्याने चालू हंगामात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना लगतच्या साखर कारखान्याच्या बरोबरीने भाव देऊन चोवीस तासांच्या आत रोख स्वरुपात पेमेंट देण्याचा निर्णय हाती घेतला आहे.

आठवडाभरात गळीतास प्रारंभ होणार असल्याने हा हंगाम यशस्वीतेसाठी सभासद ऊस उत्पादक, शेतकरी, कामगारांनी एकजुटीने सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले, तर उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*