Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर तालुक्यात भेसळयुक्त दूध पकडले

Share

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाची कारवाई

अहमदनगर (वार्ताहर) – नगरमध्ये पावडरचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी नगर तालुक्यातील भातोडी पारगाव येथील दूध संकलन केंद्रावर छापा टाकून कारवाई करण्यात आल्याने भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे साहायक आयुक्त संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी के. एस. शिंदे, नमुना साहायक प्रशांत कसबेकर यांच्यासह कर्मचार्‍यांच्या पथकाने गुरुवारी (दि.5) दुपारी नगर तालुक्यातील भातोडी पारगाव येथील हिरामण त्रिंबक शिंदे यांच्या दूध संकलन केंद्रावर छापा टाकून भेसळयुक्त दूध पकडले.

हिरामण शिंदे यांच्या दूध संकलन केंद्रावर पावडर वापरून भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्याची खात्री करण्यात आल्यानंतर गुरुवारी दुपारी या दूध संकलन केंद्रावर छापा टाकण्यात आला, त्यावेळी तेथे भेसळयुक्त दूध तयार करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच या दूध संकलन केंद्रात 23 गोण्या व्हे पावडर व दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारे इतर रसायन आढळून आले. या केंद्रात सुमारे 750 लीटर भेसळयुक्त दूध व इतर साहित्य असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भेसळयुक्त दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. दूध संकलन केंद्र चालकावर अन्न पदार्थात भेसळ प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे साहायक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.

यापूर्वी पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाने तालुक्यात भेसळयुक्त असणार्‍या केंंद्रांवर आणि प्रकल्पावर भेसळ युक्त दूध पकडलेले आहे. मात्र, त्यानंतर ही प्रकरणे गायब झालेली आहेत. पकडण्यात आलेल्या भेसळयुक्त दूध प्रकरणी नगरसह जिल्ह्यात मोठी कारवाई झालेली नाही. यासह राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध भेसळीचे प्रकार सुरू असून त्याकडे या विभागाचा कानाडोळा आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!